अटलांटा : सोफियान रहिमी आणि जेसिमे यासिन यांनी बदली खेळाडू म्हणून मैदानावर आल्यानंतर अखेरच्या काही मिनिटांत केलेल्या गोलमुळे मोरोक्कोने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना हैतीचा ४-२ असा पराभव केला. त्यामुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्या गुणाची हैती संघाची प्रतीक्षा आणखीच लांबली, तर आफ्रिकन विजेत्या मोरोक्कोने बाद फेरी गाठली.
हैतीने दोन वेळा आघाडी घेत मोरोक्कोसमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, ३९व्या मिनिटाला अश्रफ हकिमी आणि पूर्वार्धातील भरपाई वेळेत इस्माईल सायबारी यांनी केलेल्या गोलमुळे मोरोक्कोने दोन्ही वेळा बरोबरी साधली. त्यानंतर ७८व्या मिनिटाला रहिमीने मोरोक्कोला पहिल्यांदा आघाडी मिळवून दिली, तर ८९व्या मिनिटाला यासिनने चौथा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाच दशकांनी गोल
हैतीचा विश्वचषक प्रवास संपुष्टात आला. स्कॉटलंड आणि ब्राझीलकडून पराभूत झाल्यानंतर ते आधीच स्पर्धेबाहेर गेले होते. मात्र, मोरोक्कोविरुद्ध त्यांनी ५२ वर्षांनंतर विश्वचषकात गोल करण्याचा पराक्रम केला. सामन्याच्या १०व्या मिनिटाला लेनी जोसेफच्या प्रयत्नानंतर चेंडू मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बोनो याला लागून जाळ्यात गेला. हा स्वयंगोल ठरला. मोरोक्कोने ३९व्या मिनिटाला हाकिमीच्या गोलमुळे बरोबरी साधली. ब्राहिम डियाझच्या फटक्यावर हैतीचा गोलरक्षक जॉनी प्लासिदे याला चेंडू अडवण्यात अपयश आले आणि हाकिमीने संधी साधली. पहिल्या सत्राच्या अखेरीस ४३व्या मिनिटाला विल्सन इसिडोरने २५ यार्ड अंतरावरून अप्रतिम फटका मारत हैतीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र हैतीने बचावात निराशा केली. याचा मोरोक्कोने फायदा घेताना विजय साकारला.
गटात दुसर्या स्थानी
या विजयानंतरही मोरोक्कोला ‘सी’ गटात अव्वल स्थान मिळवता आले नाही. या गटातील अन्य सामन्यात ब्राझीलने मियामी येथे स्कॉटलंडला नमवले. साखळी फेरीअंती ब्राझील आणि मोरोक्को यांचे समान सात गुण झाले. मात्र, मोरोक्कोच्या (३) तुलनेत सरस गोलफरकामुळे ब्राझीलने (६) अग्रस्थान मिळवले. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा मोरोक्को संघ यंदा ‘राउंड ऑफ ३२’ फेरीत नेदरलँड्स, जपान किंवा स्वीडन यांपैकी एका संघाविरुद्ध खेळणार आहे.
