Argentina vs Egypt FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीतील सामना अर्जेंटिना आणि इजिप्त या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्याचा शेवट अपेक्षेहून अधिक थरारक राहिला. सामन्याची सुरुवात इजिप्तने गोल करुन केली. तर शेवटी अर्जेंटिनाने गोल करुन हा सामना ३-२ च्या फरकाने आपल्या नावावर केला.पण या सामन्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. इजिप्तचे मॅनेजर होसम हसन यांनी फिफाला फक्त मेस्सी हवा आहे, अशा शब्दांत टीका केली. हसन यांच्या मते, एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांचा गोल रद्द करण्यात आला. यासह इजिप्तवर अन्याय झाला आहे, असं म्हणत त्यांनी मॅच रेफ्री फ्रँकोईस लेटेस्कियर यांच्यावर देखील आरोप केले. तसेच इजिप्तचा फॉरवर्ड खेळाडू मोस्तफा जिको याने देखील मॅच रेफ्रीवर गंभीर आरोप केले आहेत.
अर्जेंटिनाचा संघ बलाढ्य संघांपैकी एक आहे. त्यामुळे अर्जेंटिनाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण इजिप्तने ज्याप्रकारे सुरुवात केली, त्यावरुन वाटलं होतं की फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळणार. या सामन्यात इजिप्तने गोल करुन दमदार सुरुवात केली. त्यानंतर ६० व्या मिनिटाला इजिप्तने आणखी एक गोल केला होता. पण VAR मध्ये पाहिलं असता हा गोल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिव्ह्यूमध्ये असं स्पष्ट झालं की, गोल करण्याआधी हसनने अर्जेंटिनाचा डिफेंडर लिसेंड्रो मार्टिनेजविरुद्ध फाऊल केला होता. त्यामुळे हा गोल अमान्य घोषित करण्यात आला.
हा गोल रद्द केल्यानंतर इजिप्तचे खेळाडू संतप्त झाले होते. सामना झाल्यानंतर इजिप्तच्या खेळाडूंनी आपला संताप जाहीर केला. मोस्तफा जिकोने रेफ्रीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. इटालियन पत्रकार फॅब्रिजियो रोमानोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मोस्तफा जिको म्हणाला, “हा कप अर्जेंटिनाला दिला जातोय. रेफ्री पक्षपाती होते. हा उघड अन्याय होता. आज ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीत अर्जेंटिनाला हरवू देणार नव्हते. ही स्पर्धा जणू त्यांच्यासाठीच आखली गेली आहे.”
हा लिओनेल मेस्सीचा शेवटचा फिफा वर्ल्डकप आहे, असं म्हटलं जात आहे. या सामन्यातील टप्प्या टप्प्यावर असं वाटत होतं की,मेस्सीचा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रवास याच सामन्यात समाप्त होऊ शकतो. कारण इजिप्तकडून यासर इब्राहिम आणि मोस्तफा जिकोने पहिल्याच टप्प्यात २ गोल केले होते. तसं पाहायला गेलं, तर इजिप्तने पहिल्याच हाफमध्ये ३-० ने आघाडी घेतली असती, पण इजिप्तचा एक गोल हा VAR मुळे रद्द करण्यात आला. अर्जेंटिनाचा पराभव होणार अशी चिन्ह होती, पण शेवटी अर्जेंटिनाने पुनरागमन केलं आणि हा सामना आपल्या नावावर केला.
या सामन्यातील ७९ व्या मिनिटाला रोमेरोने हेडरने गोल केला आणि अर्जेंटिनाला सामन्यात पुनरागमन करुन दिलं. हा गोल केल्यानंतर पुढील ४ मिनिटात मेस्सीने आणखी एक गोल केला आणि स्कोअर २-२ ने बरोबरीत आणला. हा मेस्सीचा या स्पर्धेतील ८ वा गोल ठरला. त्यानंतर अँजो फर्नांडिजने गोल करुन अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला. अर्जेंटिनाने हा सामना जिंकताच मेस्सीचे डोळे पाणावले. ह सामना जिंकून अर्जेंटिनाने टॉप ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केला आहे.
