उत्तेजक चाचणीत अपयशी ठरल्यामुळे एका भारतीय महिला क्रिकेटपटूवर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) ही बंदी घातली. अंशुला राव असे या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. अंशुला ही मध्य प्रदेशकडून क्रिकेट खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे.

अंशुलाने प्रतिबंधित उत्तेजक हेतुपुरस्सर घेतले, असे नाडाने सांगितले. ती मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एमपीसीए) माध्यमातून बीसीसीआयची नोंदणीकृत खेळाडू आहे. तिने २०१९-२० मध्ये महिलांच्या अंडर-२३ टी-२० स्पर्धेत भाग घेतला होता. १४ मार्चला ती पॉझिटिव्ह आढळली. तिचे दोन नमुने बेल्जियममध्ये पाठविण्यात आले. या नमुन्यांमध्ये बंदी घातलेली औषधे आढळली.

 

हेही वाचा – BCCIच्या ‘बॉस’कडून टी-२० वर्ल्डकपच्या भारताबाहेरील आयोजनावर शिक्कामोर्तब!

अष्टपैलू अंशुलाने मध्य प्रदेशसाठी अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन केल्याबद्दल तिला निलंबित करण्यात आले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये ती बडोद्यात पॉझिटिव्ह आढळली होती.

अँटी-डोपिंग डिसिप्लिनरी पॅनलचे मत

अँटी-डोपिंग डिसिप्लिनरी पॅनलचे चेरमन अ‍ॅडव्होकेट गौरंग कांत, सदस्य डॉ. राणा आणि स्पोर्ट्समन अखिल कुमार यांचा असा विश्वास आहे, की खेळाडूंनी त्याच्या शरीराची देखभाल करावी आणि कोणत्याही प्रकारच्या बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन न करणे ही पूर्णपणे त्यांची जबाबदारी आहे. पॅनेल या प्रकरणात अंशुलाचे समर्थन करत नाही, कारण तिने बंदी घातलेला पदार्थ सापडल्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.