रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरुन विराट कोहली पायउतार झाल्यानंतर आता मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळख असणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सनेही आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. आपण या पुढे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणार नसल्याचं डिव्हिलियर्सने जाहीर केलं होतं. यासंदर्भातील माहिती त्याने आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिलीय.

हा प्रवास फार भन्नाट होता मात्र मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय, अशी आपल्या पोस्टला सुरुवात करत डिव्हिलियर्सने सर्व चाहत्यांचे आभार मानलेत. विशेष म्हणजे त्याने धन्यवाद या शब्दासहीत स्वत:चा एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो या पोस्टसोबत शेअर केलाय.

नक्की वाचा >> Sexting Scandal मुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये मोठा भूकंप; टीप पेनने सोडलं कर्णधार पद

“अगदी अंगणामध्ये माझ्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळण्यापासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने खेळतो. आता वयाच्या ३७ वर्षी ती (उत्साहाची) ज्वाला त्याच तेजाने तेवत नाही. हे सत्य आहे आणि मला याचा स्वीकार करायलाच हवा. हे अचानक वाटत असलं तरी तसं नाहीय. म्हणूनच मी आज ही (निवृत्तीची) घोषणा करतोय,” असं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.

“क्रिकेट हा खेळाने मला कायमच फार मायेनं जवळ केलं आहे. मग ते टायटन्ससाठी खेळणं असो, दक्षिण आफ्रिकेसाठी किंवा आरसीबीसाठी असू किंवा जगात कुठेही असो, या खेळाने मला विचारही करता येणार नाही असे अनुभव आणि संधी दिल्या. यासाठी मी कायमच आभारी राहीन,” असं डिव्हिलियर्स म्हणालाय.

नक्की पाहा >> वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याला पडला महागात; व्हिडीओ झालाय व्हायरल

“मला माझ्या सर्व संघ सहकार्यांचे, विरोधी संघातील खेळाडूंचे, प्रत्येक प्रशिक्षकाचे, प्रत्येक फिजिओचे आणि प्रत्येक स्टाफ मेंबरचे आभार मानाचे आहेत ज्यांनी माझ्यासोबत हा प्रवास केला. मला दक्षिण आफ्रिका आणि भारताबरोबरच जगभरामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलो तिथे मिळालेला पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो,” अशा भावनिक शब्दांमध्ये डिव्हिलियर्सने सर्वांचे आभार मानलेत.

नक्की पाहा हे फोटो >> राहुल द्रविडमधील ‘र’ अन् सचिन तेंडुलकरमधील ‘चिन’ = रचिन; जाणून घ्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रचं जवागल श्रीनाथ कनेक्शन

“अगदी शेवटी हे सांगू इच्छितो की माझ्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाशिवाय, तडजोडींशिवाय हे सर्व शक्य नव्हतं याची मला जाणीव आहे. माझे पालक, माझे भाऊ, माझी पत्नी डॅनिली आणि माझी मुलं. आता मी माझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीकडे फार आशेने पाहत आहे ज्यात मी त्यांना प्राधान्य क्रमावर ठेवणार आहे,” असं म्हणत डिव्हिलियर्सने क्रिकेटचा निरोप घेतलाय.

मागील तीन वर्षांपासून डिव्हिलियर्स त्याच्या राष्ट्रीय संघामधून खेळला नसला तरी तो आरसीबीसाठी खेळत होता. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो आरसीबीसाठी १५ सामने खेळला. यामध्ये त्याने ३१.३० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या. आता त्याने निवृत्तीची घोषणा केल्याने तो आयपीएलही खेळणार नाहीय. आयपीएलमध्ये त्याने एकूण ५ हजार १६२ धाव केल्या आहेत. तो आयपीएलच्या १८४ सामने खेळा असून त्याची सरासरी ३९.७० इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५१.६८ इतका आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.