IPL 2026 How MS Dhoni Advice Help Noor Ahmad: आयपीएल २०२६ मधील रायव्हलरी विकमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना झाला आहे. चेन्नईच्या विजयाचा हिरो हा नूर अहमद ठरला. पण या सामन्यापूर्वी नूर अहमदसाठी मागील काही महिने खूप कठीण गेले होते. जानेवारीपासून त्याच्या खात्यात फक्त एकच विकेट होता, जो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील घरच्या सामन्यात घेतला होता. मात्र मंगळवारी त्याने जोरदार पुनरागमन करत चार षटकांत २१ धावा देत ३ विकेट्स अशी प्रभावी कामगिरी केली आणि चेन्नई सुपर किंग्सच्या ३२ धावांच्या विजयात मोलाचा वाटा उचलत सामनावीर पुरस्कार पटकावला.
नूर अहमद हा फिरकी खेळपट्टीवर किती प्रभावी गोलंदाज आहे हे आपण त्याला सीएसकेकडून खेळताना पाहिलं आहेच. चेन्नईच्या चेपॉकवरील विजयात त्यांच्या फिरकी गोलंदाजांचं श्रेय कायम महत्त्वाचं राहिलं आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा केकेआरविरूद्ध सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यापूर्वी एम एस धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे नूर महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी ठरला.
फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर नूरने काहीही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. विशेष म्हणजे, त्याने आपल्या गुगलीचा अतिरेक टाळला आणि उजव्या हाताच्या फलंदाजांकडे आत वळणाऱ्या चेंडूवर अधिक भर दिला. त्याच्या या पुनरागमनामागे चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी एम एस धोनी यांच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कारणीभूत असल्याचं सांगितलं.
धोनीने नूर अहमदला सामन्यापूर्वी काय सल्ला दिला होता?
“आज खेळपट्टीने त्याला साथ दिली, त्यामुळे त्याची गोलंदाजी चांगली झाली. यापूर्वीच्या खेळपट्ट्या थोड्या सपाट होत्या. आज त्याने चेंडू थोडा हळू टाकला, त्यात अधिक साइड स्पिन होती आणि चेंडूला जास्त ड्रॉप मिळत होता, यावर तो सध्या मेहनत घेत आहे. सराव सत्रांपैकी एका सत्रात एमएस (धोनी) यांनी त्याच्याशी सविस्तर चर्चा केली आणि लेग ब्रेकवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. याचा त्याला खूप फायदा झाला आणि त्याचे परिणाम आज दिसून आले,” असं श्रीराम यांनी सामन्यानंतर सांगितलं.
सामन्याच्या आदल्या दिवशी नूर बराच वेळ नेटमध्ये सराव करत होता, तेव्हा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि धोनी त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. न्यूझीलंडचा फ्लेमिंग नूरच्या मागे उभा होता, तर धोनी नेट्सच्या मागून त्याचं निरीक्षण करत होता. सत्राच्या शेवटी दोघांनी अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूसोबत बराच वेळ चर्चा केली. नूरने आयपीएल २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत २४ बळी घेतले होते. मात्र, या हंगामात प्रवेश करताना तो फॉर्मसाठी झगडत होता, त्यामुळे टी-२० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या कोणत्याही सामन्यात त्याला सुरुवातीपासून खेळण्याची संधीही मिळाली नाही.
चेन्नईसाठी मधल्या षटकांमध्ये नूरची भूमिका महत्त्वाची असताना, त्याने अनेकदा आपल्या लाइन आणि लेंग्थमध्ये चुका केल्या होत्या. तो अनेकदा जास्त वेगाने गोलंदाजी करत होता, ज्यामुळे त्याचे चेंडू फ्लॅट ट्रॅजेक्टरीने येत होते आणि फलंदाजांना सहज फटके मारण्यासाठी जागा मिळत होती. मात्र मंगळवारी त्याच्या वेगात स्पष्ट बदल दिसून आला. श्रीराम यांनी सांगितलं की, प्रभावी गोलंदाजी करण्यासाठी नूरने बचावात्मक न राहता आक्रमक पद्धतीने चेंडूला वळण (डिव्हिएशन) मिळवण्याचे मार्ग शोधायला हवेत.
“माझ्या मते, पिचवरून थोडं वळण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. तो याच गोष्टीवर काम करत आहे. काही दिवस पिच पूर्णपणे फलंदाजांसाठी सपाट असतात, हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण तरीही आक्रमक राहणं, चेंडूवर जास्त रेव्ह्ज देणं आणि त्याला फिरवणं त्याला नक्कीच मदत करेल. यामुळे फलंदाजांकडून चुका घडवून आणता येतात. “कारण एकदा तुम्ही बचावात्मक खेळायला सुरुवात केली, की फलंदाज तुमच्यावर हावी होतात,” असे ते म्हणाले.
