भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या अनेक विषयांमुळे चर्चेत आहे. विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार असे साऱ्यांना वाटले होते. पण इतक्यात निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट संकेत धोनीने दिले. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आगामी विंडीज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली. आपल्याला सैन्यदलाची सेवा करायची असल्यामुळे दोन महिने विश्रांती घेत आहोत, असे धोनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

धोनी हा प्रादेशिक सैन्यदलात पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल या पदावर सेवेत आहे. धोनीच्या या निर्णयामुळे त्याची निवृत्तीची चर्चा लांबणीवर पडली आहे. या दरम्यान आनंद महिंद्रा यांनी धोनीचा ३ वर्षे जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी धोनीची स्तुती केली आहे. लष्करी गणवेशात तुझा रुबाब अधिकच उठून दिसतो, असे त्यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, ‘‘महेंद्रसिंह धोनी सध्यातरी क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये, हे मी आधी स्पष्ट करू इच्छितो. त्याचबरोबर आधीच ठरवल्याप्रमाणे तो दोन महिने सैन्यदलाची सेवा करणार आहे. धोनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचा निर्णय आम्ही कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना कळवला आहे,’’ असे BCCI च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

३८ वर्षीय धोनीने निवृत्त होण्यास नकार दिल्यामुळे त्याची पुढील मालिकेसाठी संघात निवड करायची अथवा नाही, याचा निर्णय आता निवड समितीला घ्यावा लागणार आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विंडीज दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भविष्याकडे वाटचाल करण्याचे ध्येय अंगिकारले असले तरी धोनीचा मुद्दा अद्याप संपलेला नाही, याचीही जाण आहे. ‘‘दर्जेदार क्रिकेटपटूंनी कधी निवृत्त व्हायचे, याचा अधिकार निवड समितीला नसतो. मात्र संघनिवडीचा विषय येतो, त्यावेळी या प्रश्नाला त्यांना सामोरे जावे लागतेच,’’ असेही त्यांनी सांगितले.