वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. त्याच्या ग्लोव्ह्जवरील हे चिन्ह काढून टाकावे असे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिले असून यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रशासक विनोद राय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

महेंद्रसिंह धोनीने आपल्या यष्टीरक्षक ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह लावलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चिन्ह कोणालाही वापरण्याची परवानगी नाहीये. या चिन्हाला ‘बलिदान चिन्ह’ असं म्हटलं जातं, पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. मात्र, हे चिन्ह काढून टाकण्याचे आदेश आयसीसीने दिले आहे. यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी धोनीला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे होते.

शुक्रवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी प्रशासक विनोद राय यांना माध्यमांनी या वादावर प्रश्न विचारला. यावर विनोद राय म्हणाले, आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर भाष्य करु.

तर राजीव शुक्ला यांनी देखील धोनीच्या कृतीचे समर्थन केले आहे. धोनीने नियमांचे उल्लंघन केले नाही आणि त्याने याद्वारे कोणाचाही प्रचार केला नाही, असे राजीव शुक्ला यांनी सांगितले.

दरम्यान, आयसीसीच्या आदेशावरुन सोशल मीडियावर टीका होत आहे. पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी मैदानात पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो तर धोनीने ग्लोज घातल्यास त्यात चुकीचे काय असा सवाल उपस्थित करत आयसीसीवर टीका केली. फतेह यांच्याबरोबर अनेक नेटकऱ्यांनी या प्रकरणात धोनीच पाठराखण केली आहे. ‘बलिदान’ असा संदेश देणारे चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज धोनीने पुढील सामन्यातही वापरावेत अशी गळ नेटकऱ्यांनी धोनीला घातली आहे. ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग असून हा हॅशटॅग वापरून अनेकांनी धोनीच्या या कृतीचे समर्थन केले आहे.