MS Dhoni Jersey Number Changed: आयपीएल २०२६ स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेला येत्या २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना बलाढ्य सनरायझर्स संघाविरूद्ध होणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. पण स्पर्धेला सुरूवात होण्याआधी एमएस धोनीची चर्चा रंगली आहे. यावेळी त्याचा जर्सी नंबर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नेमकं कारण काय? जाणून घ्या.
आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघ आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध खेळणार आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. क्रिकेटमध्ये ७ क्रमांकाची जर्सी म्हटलं, तर सर्वांना लगेच एमएस धोनी आठवतो. पण यावेळी तो ७ नव्हे, तर ८ क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
धोनीने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “७ क्रमांकाची आठवण नेहमी मनात कायम असेल, पण आता बदल करण्याची वेळ आली आहे.” धोनीने हा निर्णय का घेतला, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण धोनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, लवकरच याबाबत खुलासा केला जाणार आहे. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा ब्रँड प्रमोशनचा एक भाग आहे.
गेल्या हंगामापर्यंत रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. जो आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. चेन्नईकडून खेळत असताना जडेजा ८ क्रमांकाची जर्सी परिधान करायचा. त्यामुळे सोशल मीडियावर, जडेजाचा क्रमांक आता धोनीला दिला जाईल, ८ क्रमांकाची जर्सी आता धोनीची नवी ओळख बनू शकते अशी चर्चा रंगली आहे. पण नेमकं कारण काय, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
धोनी ७ क्रमांकाची जर्सी का परिधान करतो, याबाबत मोठा खुलासा करण्यात आला होता. एका मुलाखतीत धोनी म्हणाला होता की, त्याचा जन्म ७ जुलैला झाला होता, त्यामुळे त्याने ७ क्रमांकाची जर्सी परिधान करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा केवळ एक जर्सी क्रमांक नसून ब्रँड बनला आहे. २००८ पासून आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाली आहे. धोनी पहिल्या हंमामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. तो सुरूवातीपासून ७ क्रमांकाची जर्सी परिधान करत आहे. यावेळी तो ८ क्रमांकाची जर्सी परिधान करणार का? हे पाहणं महत्वाचं महत्वाचं ठरणार आहे.
