MS Dhoni Comeback date confirmed IPL 2026: आयपीएल २०२६ ची सुरूवात आरसीबीसाठी फारच खराब झाली आहे. आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स सर्वच सामन्यांदरम्यान संघर्ष करताना दिसत आहे. पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन सीएसके संघाने सुरूवातीचे तिन्ही सामने गमावले असून गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत. संघाचा आयकॉन आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पोटरीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने सुरूवातीचे सामने मैदानात उतरू शकला नाही. आता मात्र धोनीच्या पुनरागमनाची तारीख ठरली आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीला, सीएसके फ्रँचायझीने जाहीर केलं होतं की धोनी त्याच्या दुखापतीतून सावरत असून पहिल्या दोन आठवड्यांसाठी तो अनुपलब्ध असेल. आता, त्याच्या तंदुरुस्तीबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. धोनी लवकरच सीएसकेसाठी मैदानावर खेळताना दिसणार आहे. त्याच्या पुनरागमनाची तारीखदेखील ठरली आहे.

एम एस धोनी कोणत्या दिवशी मैदानावर उतरणार?

माध्यमांच्या वृत्तानुसार, धोनी ११ एप्रिल २०२६ रोजी एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणारा घरच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तो १४ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्धच्या पुढील सामन्यात पुनरागमन करेल. धोनी पूर्णपणे फिट असेल तर १४ एप्रिलच्या सामन्यासाठी संघात सामील होईल. पण, चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) धोनीच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

एम एस धोनी संघात दाखल झाला असून त्याच्या सरावाचे व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. धोनी नेट्समध्ये एकापेक्षा एक उत्तुंग षटकार मारताना दिसला आहे. त्यामुळे धोनी मैदानावर उतरत संघाला कधी सावरणार, याकडे सीएसके चाहत्यांच्या नजरा आहेत. घरच्या मैदानावरही चेन्नई संघाने सामना गमावल्याने चाहते चिंतेत आहेत.

धोनीची अनुपस्थिती सीएसकेसाठी मोठी हानीकारक ठरत आहे, कारण संघाने सलग तीन सामने गमावले आहेत आणि संघ या हंगामातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दुखापतीमुळे, धोनी फिट होण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चेन्नईमध्येच थांबला आहे आणि संघाच्या सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली उपचार घेत फिटनेस मिळवत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सरावही केला होता, परंतु तो अजूनही सामन्यासाठी पूर्णपणे फिट झालेला नसल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर येत आहे.

धोनीव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेचा तरूण फलंदाज डेवाल्ड ब्रेविसच्या दुखापतीमुळे सीएसकेला आणखी एक धक्का बसला होता. बरगडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे ब्रेविस पहिल्या तीन सामन्यांमधून बाहेर होता. मात्र, त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ब्रेविसने नुकताच चाहत्यांना सांगितलं असून, आपण ११ एप्रिल रोजी मैदानावर परतणार असल्याचं म्हटलं आहे.