MS Dhoni Fine for Overspeeding in Ranchi news: आयपीएलचा १९वा हंगाम काही दिवसांनी सुरू होत आहे. तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. दुचाकी आणि विविध प्रकारची वाहने गोळा करण्याचा आणि त्या मनसोक्तपणे चालविण्याचा छंद धोनीला आहे. मात्र या छंदामुळे त्याला आता एका अडचणीला सामोरे जावे लागले आहे. रांची येथे भरधाव वाहन चालवून वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी धोनीला दोषी ठरविण्यात आले आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८३ नुसार नियम मोडल्यामुळे त्याला ई-चलन पाठविण्यात आले आहे.

रांची शहरात तैनात केलेल्या वाहतूक देखरेख यंत्रणेने धोनीच्या निवासस्थानाजवळ वेगाचे उल्लंघन झाल्याची नोंद केली. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्याचे स्वयंचलित देखरेख प्रणालीद्वारे समोर आल्यानंतर धोनीविरोधात डिजिटल चलन जारी करण्यात आले आहे. धोनीला १००० रुपयांचा दंड भरण्यासाठी ई-चलन पाठविण्यात आले आहे.

जरी हा गुन्हा किरकोळ मानला जात असला तरी एमएस धोनीचे नाव जोडल्यामुळे सोशल मीडियावर या विषयाची चर्चा होत आहे.

मालमत्तेशी निगडित नोटीसही जारी

काही दिवसांपूर्वीच झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने धोनीला नोटीस बजावली होती. एका निवासी भूखंडाचा गैरवापर केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा वेगात वाहन चालविल्यामुळे धोनीवर दंड बसला आहे.

गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरमू मार्गावर असलेला एक भूखंड केवळ निवासी उपयोगासाठी वितरित केला होता. मात्र याचा वापर व्यावसायिक उद्देशासाठी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याठिकाणी धोनी पूर्वी राहत होता. मात्र आता तो रिंग रोडवरील त्याच्या जुन्या निवासस्थानी पुन्हा परतला आहे.

आयपीएल २०२६ साठी धोनी सज्ज

दरम्यान धोनी सध्या रांचीत नाही. तो आयपीएल २०२६ च्या तयारीला लागला आहे. नेट्समध्ये तो घाम गाळत असून चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर १ मार्च रोजी धोनीच्या नेट सेशनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. पाचवेळा विजेते ठरलेल्या चेन्नईच्या संघासाठी २०२५ मधील हंगाम निराशाजनक ठरला होता.

मात्र २०२६ साठी धोनी आणि चेन्नईच्या संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ४४ वर्षीय धोनी आयपीएलमधून कधी निवृत्त होणार, अशीची एक चर्चा प्रत्येक आयपीएल हंगामाच्या वेळेस केली जाते. मात्र आजवर धोनीने या चर्चा मनावर न घेता माझ्यात अजून क्रिकेट बाकी आहे, अशी भूमिका वेळोवेळी घेतली आहे.