MS Dhoni Hired Hookah Man: आयपीएल २०२४ नंतर, एम.एस. धोनी हुक्का ओढत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून चाहत्यांना उत्सुकता होती की धोनीला खरंच हुक्का आवडतो का? आता, चेन्नई सुपर किंग्सच्या एका माजी सहकाऱ्याने धोनीच्या सवयीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सीएसकेकडून खेळलेला इंग्लंडचा यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सने धोनीच्या हुक्का पिण्याबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे.

सॅम बिलिंग्सने ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टवर धोनीच्या हुक्का पिण्याच्या सवयीबद्दल भाष्य केलं. ज्यामध्ये एलिस्टर कूक, फिल टफनेल आणि मायकल वॉ यांचाही सहभाग होता. त्याने सांगितलं की, टीम हॉटेलमधील धोनीची खोली सर्वांसाठी खुली असते. त्याच्या खोलीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेली छोटी हुक्का व्यवस्था. हुक्का सांभाळण्याची जबाबदारी देखील त्याने संघातील एका खेळाडूला दिली आहे. ज्याला संघाने ४.८० कोटींना ताफ्यात सामील केलं आहे.

“फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यांच्यासोबत खेळला आहात, त्यांपैकी तुमचा आवडता खेळाडू कोण?” असं विचारल्यावर, सॅम बिलिंग्सने एम.एस. धोनीचं नाव घेतलं आणि म्हणाला, “अर्थातच धोनी. कारण मला वाटतं की त्याचं नेतृत्त्व आणि व्यक्तिमत्त्व अप्रतिम आहे. तो खूप शांत आणि मनमिळाऊ आहे. तो एक खूप छान माणूस आहे. आजकाल असे उत्तम लोक फारसे आढळत नाहीत. तो एक अद्भुत व्यक्ती आहे.”

मग बिलिंग्सने धोनीच्या हुक्का पिण्याबद्दल एक गोष्ट उघड केली. सॅम पुढे म्हणाला, “तो माझ्यासारखाच मँचेस्टर युनायटेडचा चाहता आहे. आम्ही मँचेस्टर युनायटेडचा प्रत्येक सामना बघायचो. त्याला हॉटेलमधून बाहेर पडण्याची, अगदी खाली असलेल्या बारमध्ये जाण्याचीही परवानगी नव्हती. त्याची खोली उघडी होती आणि तिथे एक ‘शिशा मॅन’ होता, जो फक्त शिशाची (हुक्क्याची) काळजी घ्यायचा. शिशाची (हुक्क्याची) काळजी घेणं हेच त्याचं काम होतं.”

धोनीला भारताचा कोणता खेळाडू हुक्का तयार करून देतो?

सॅम बिलिंग्सने केलेल्या खुलासामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. मात्र, हे स्पष्ट आहे की हुक्का म्हणजे केवळ तंबाखूच नव्हे. हुक्का किंवा शिशा विविध फ्लेवर्समध्येही उपलब्ध असतात, ज्यात तंबाखू नसतो. बिलिंग्सने हे वक्तव्य करत धोनीची हुक्का स्टोरी जगभर पोहोचवली आहे.

हुक्क्याची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणजे खलील अहमद. सॅम बिलिंग्सच्या मते, धोनीसाठी हुक्का तयार करणं हे खलील अहमदचं महत्त्वाचं काम आहे.