आगामी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. आठ सत्रात चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा महेंद्रसिंह धोनी गेल्या दोन सत्रात पुण्याकडून खेळताना दिसला होता. त्यामुळे यंदाच्या पर्वात तो चेन्नईकडून खेळणार की अन्य कोणता संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी अधिक रक्कम मोजणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सध्याच्या घडीला धोनीचा फॉर्म पाहता आयपीएलच्या लिलावात धोनीच्या नावाची चांगलीच चलती असणार, अशा प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातून उमटताना दिसत आहेत.

२०१८ मध्ये रंगणाऱ्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी जर लिलावात उतरला तर त्याला संघात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळेल, असा अंदाज माजी क्रिकेटर निखिल चोप्रा यांनी व्यक्त केला. तर सध्याच्या घडीला धोनी हा क्रीडा जगतातील मोठी मालमत्ता असल्याचे मत ब्रँड विश्लेषक आणि कार्यकारी संचालक हरिश बिजूर यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. दोन वर्षांच्या निलंबनानंतर मैदानात उतरणारा चेन्नई धोनीला पुन्हा आपल्या संघाची धुरा देण्यासाठी उत्सुक असेल. मात्र त्याला पुन्हा संघाचा अविभाज्य घटक करुन घेण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. कोहली वगळता धोनीला टक्कर देणारा खेळाडू सध्याच्या घडीला दिसत नाही, असेही ते म्हणाले.

बिजूर यांच्या मताशी निखिल चोप्रा यांनी देखील संमती दर्शवली. ते म्हणाले की, आयपीएलच्या लिलावामध्ये धोनी अव्वल पाच खेळाडूंमध्ये असेल. त्याच्या अंगी असणारे नेतृत्व गुण आणि सामना जिंकून देण्याचे कसब कोणत्याही संघाला फायदेशीर ठरेल. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये संघ त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यासच प्राधान्य देईल, यात शंका नाही. आगामी स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासह १० संघांमध्ये आयपीएलची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे. चेन्नई संघावरील बंदी उठवल्यानंतर चेन्नई संघाचे मालक आणि इंडिया सीमेंटचे व्यवस्थापकिय संचालक श्रीनिवासन यांनी धोनीच पुन्हा चेन्नईचे नेतृत्व करेल, असे म्हटले होते. धोनीने आयपीएलच्या आठ सत्रामध्ये चेन्नईचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तब्बल सहावेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर दोनवेळा जेतेपद मिळवले आहे.