CSK CEO On MS Dhoni Retirement: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघाने ५ वेळा जेतेपदाचा मान मिळवला. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली होती. २०२६ मध्येही धोनी चेन्नईचा भाग होता. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. चेन्नईचा चेपॉकच्या मैदानावरील शेवटचा सामना झाल्यानंतर धोनी निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण धोनीने अद्यापही निवृत्तीची घोषणा केलेली नाही. दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

आयपीएल स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. पण तरीही एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, या हंगामानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करणार का? धोनी चेपॉकच्या मैदानावर शेवटचा आयपीएल सामना खेळणार असं म्हटलं जात होतं. काशी विश्वनाथन यांच्या मते, निवृत्ती जाहीर करायची की नाही हे धोनीवर अवलंबून आहे. यासह ते असंही म्हणाले की, चेन्नई सुपर किंग्सला असंच वाटतं की, धोनीने कुठल्याही भूमिकेत संघासोबत राहावं.

काशी विश्वनाथन म्हणाले, “आम्ही अजूनपर्यंत धोनीसोबत याविषयी कुठलीही चर्चा केलेली नाही. धोनी आपले निर्णय स्वत: घेतो आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो खेळाडू, प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक अशा कोणत्याही स्वरूपात असो, त्याने चेन्नई सुपर किंग्सचा एक कायमस्वरूपी सदस्य म्हणून संघात राहावे, हीच आमची नेहमी इच्छा असेल. कोणताही अंतिम निर्णय पूर्णपणे त्याचाच असेल.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “ऋतुराजने एमएस धोनीला ३-४ वर्ष खूप जवळून पाहिल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. एमएस आणि फ्लेमिंगने ऋतुराजला शांत कर्णधार म्हणून तयार केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे, येत्या काही वर्षांत तो हे गुण अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करेल.”