आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची वेगळी ओळख निर्माण करुन देणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीने आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ICCची सर्वाधिक विजेतेपद पटकावली. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सर्व स्तरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी त्याला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचीही विनंती केली. याचदरम्यान भारताचा माजी यष्टीरक्षक सबा करीम याने आपले एक मत व्यक्त केलं.

“धोनी हा अद्यापही एकदम तंदुरूस्त आहे. आपल्या फिटनेसवर तो खूप मेहनत घेतो हे मला माहिती आहे. त्यातच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे आता त्याच्यावरील शारीरिक ताणदेखील कमी होण्यास मदत होईल. पण सध्या जागतिक क्रिकेटला धोनीसारख्या एका आदर्श अशा क्रिकेटपटूची गरज आहे. धोनीने IPL च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये कसा खेळ करावा हे धोनीने त्याच्या बॅटने आणि मैदानावरील शांत वर्तणुकीतून दाखवून दिले. त्यामुळे भारताला टी२० क्रिकेट झटपट परिचयाचे झाले”, असे सबा करीम म्हणाला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली, तरी तो IPL सामन्यांमध्ये मात्र खेळताना दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला होता.