MS Dhoni is playing in CSK vs SRH Match or not: आयपीएल २०२६ मध्ये आजचा १८ मे रोजी होणारा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सचा यंदाच्या हंगामातील हा अखेरचा गट सामना असणार आहे. त्यामुळे तुआजच्या सामन्यात यंदा एकही सामना न खेळलेला एम एस धोनी खेळू शकतो, यावर सर्वांच्या नजरा होत्या. आता कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेकीदरम्यान धोनीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

चेपॉकच्या मैदानावर होत असलेल्या चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याची नाणेफेक ऋतुराज गायकवाडने जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह हैदराबादचा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसेल. चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे.

एम एस धोनीला त्याचा आयपीएलमधील अखेरचा सामना चेन्नईत चेपॉकच्या मैदानावर खेळायचा असल्याची इच्छा त्याने ५ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. ४४ वर्षीय धोनी यंदाच्या हंगामात पोटरीच्या दुखापतीमुळे आतापर्यंतचा एकही सामना खेळू शकला नाही. याशिवाय धोनी यंदा आयपीएलमधून निवृत्त होऊ शकतो, अशा चर्चाही रंगल्या होत्या. यादरम्यान चेन्नईचा अखेरचा गट सामना चेन्नईत होणार असल्याने या सामन्यात धोनी खेळत निवृत्त होऊ शकतो, अशी बातमी समोर आली होती.

नाणेफेकीनंतर रवी शास्त्री यांनी सर्वांना अपेक्षित असा महत्त्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे एम एस धोनी आज खेळणार आहे का, यावर उत्तर देण्यापूर्वी ऋतुराज दोन मिनिट थांबला आणि म्हणाला, धोनी इथे संघासोबत आहे, पण सामना खेळण्याइतका तो फिट झालेला नाही. त्यामुळे तो आजचा सामनाही खेळणार नाही.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकिल हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मारक रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे.