स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळली होती. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलिया संघाला चांगलाच हिसका दाखवला. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांना निश्चितच असेल.

सध्याच्या घडीला दमदार फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीनं केलेला करिश्मा करु शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचं असेल. आतापर्यंत धोनीशिवाय अन्य कोणत्याही भारतीय कर्णधाराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करता आलेली नाही. भारतीय संघाची मदार खांद्यावर असताना धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शतके झळकावली आहेत. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. ज्यात दोन शतकांच्या मदतीने धोनीने १२०४ धावा केल्या आहेत. नेतृत्वाची धुरा सांभाळत असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही धोनीच्या नावे आहे.

महेंद्रसिंह धोनीने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते. नागपूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावफलकावर अवघ्या ९७ धावा असताना भारताचे ३ गडी तंबूत परतले होते. यावेळी धोनीने गौतम गंभीरच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. त्याने या सामन्यात १०७ चेंडूत १२४ धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना ९९ धावांनी जिंकला होता. या दमदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे शतक झळकवण्यासाठी धोनीने चार वर्षांचा कालावधी घेतला. १९ ऑक्टोबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने १३९ धावांची दमदार खेळी केली होती. धोनीच्या शतकी खेळीनंतरही भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.