भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्टच्या संध्याकाळी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. धोनीच्या निवृत्तीनंतर अनेकांना धक्काच बसला होता. आता असाच काहीसा धक्का यंदाच्या स्वातंत्र्यदिनी चाहत्यांना बसला आहे. सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली धोनीप्रमाणे निवृत्त होत असल्याचे ट्वीट सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

एका वर्षापूर्वी, या दिवशी धोनीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. आज पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना सकाळी धक्का बसला. विराटच्या नावाने क्रिकेटमधून निवृत्तीचे ट्वीट सर्वत्र व्हायरल झाले. या ट्वीटमध्ये त्याने धोनीच्या शैलीत निवृत्ती घेतली, असे म्हटले आहे. या व्हायरल ट्वीटमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

 

शहानिशा केल्यावर हे एक फेक ट्वीट असल्याचे समोर आले. मात्र, काही लोकांना हे ट्वीट खरे वाटले. वास्तविक विराट कोहली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मागील काही काळापासून विराट फॉर्ममध्ये नसल्याने तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या वर्षपूर्तीनंतरही विराटला ट्रोल केले जात आहे.

भारत-इंग्लंडमध्ये सुरूय लॉर्ड्स कसोटी

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीमुळे संपूर्ण इंग्लंडचा पहिल्या डावात ३९१ धावांवर खेळ आटोपला आहे. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लिश संघाने २७ धावांची आघाडी घेतली. रूटसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, चहापानानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या आहेत.