MS Dhoni opened up about his bond with Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यातील नाते नेहमीच चर्चेचा विषय राहिले. या दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही स्पष्टपणे दिसून येतात. धोनी आणि कोहली भारतीय संघासाठी दीर्घकाळ एकत्र खेळले आणि एकमेकांच्या नेतृत्वाखाली त्यांची छापही सोडली. त्यांची मैत्री परस्पर आदरावर आधारित आहे, जी कालांतराने घट्ट होत गेली. अशात माहीने प्रथमच विराटशी असलेल्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विराटचे धोनीच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण –

धोनीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा कोहली एक युवा खेळाडू म्हणून पुढे आला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना कोहलीने आपल्या खेळात सुधारणा केली. यानंतर त्याने जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण केले. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, ज्यामध्ये कोहलीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेष म्हणजे विराट कोहलीने २००९ मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

२०१४ मध्ये धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद कोहलीकडे सोपवले –

यानंतर २०१४ मध्ये धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद कोहलीकडे सोपवले आणि २०१७ मध्ये सर्व फॉरमॅटची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर आली. धोनी आणि कोहली यांच्या नात्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नेहमीच एकमेकांच्या कामगिरीचे जाहीरपणे कौतुक केले. आता एमएस धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे.

हेही वाचा – Samit Dravid : राहुल द्रविडचा मुलगा समित भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड होऊनही विश्वचषकात का खेळू शकणार नाही? जाणून घ्या

‘मी त्याचा मोठा भाऊ किंवा इतर काहीही नाही’ –

ज्यामध्ये माही विराटबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाला, “आम्ही २००८/०९ पासून एकत्र खेळत आहोत. वयाचा फरक असला तरी, मी त्याचा मोठा भाऊ किंवा इतर काहीही आहे, असे मी म्हणणार नाही. आम्ही फक्त असे सहकारी आहोत, जे भारतासाठी दीर्घकाळ खेळलो आहोत. तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.” दुसरीकडे, कोहलीही अनेक प्रसंगी धोनीला आपला गुरू मानतो आणि धोनीच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकल्याचे सांगतो.

हेही वाचा – Jonty Rhodes : जॉन्टी ऱ्होड्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकण?

धोनी-कोहलीने भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय क्षण दिले –

धोनी आणि कोहलीने भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय क्षण दिले आहेत. त्यांची भागीदारी, विशेषत: लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच संस्मरणीय राहील. अलीकडेच, कोहलीने भारताला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली. आता कोहली पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो.