MS Dhoni Instagram Post After India T20 World Cup Win: ८ मार्च २०२६ हा भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. भारताने न्यूझीलंड संघाला ९६ धावांनी पराभूत करत विक्रमी तिसरा टी-२० विश्वचषक जिंकला. टीम इंडियाने अंतिम सामन्यात इतिहास घडवल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर खूप दिवसांनी एक पोस्ट शेअर केली. त्याने इन्स्टाग्रामवर टीम इंडियाचं विजयाबद्दल अभिनंदन केलं, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. दरम्यान गौतम गंभीरसाठी खास वाक्य लिहिलं.

खुद्द एम एस धोनी टीम इंडियाचा सेमीफायनल आणि फायनल सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अटीतटीचा सेमीफायनल सामना मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला गेला, ज्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. तर अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला आणि जिथे भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत जेतेपद पटकावलं. फायनल सामना धोनीने रोहित शर्मा व जय शाह यांच्यासह बसून पाहिला.

अंतिम सामन्यापूर्वी भारताचे हे दोन दिग्गज माजी खेळाडू एम एस धोनी व रोहित शर्मा यांनी टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर एकत्र घेऊन आले, जो भारतीय चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. सामन्यादरम्यान भारताचे तिन्ही वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव, एम एस धोनी व रोहित शर्मा यांनी एकत्र सामना पाहतानाचा क्षण ही कॅमेऱ्यात टिपला होता.

एम एस धोनीचा कोच गंभीरसाठी खास मेसेज

एम एस धोनीने भारताच्या ऐतिहासिक टी-२० विश्वचषक विजयानंतर खास पोस्ट शेअर करत लिहिलं, अहमदाबादमध्ये इतिहास घडला आहे. “टीम, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुम्हा सर्वांना खेळताना पाहून आनंद झाला. कोच साहेब चेहऱ्यावरील हे हसू छान वाटतंय. इंटेसिटीसह या स्माईलचं कॉम्बिनेशन अगदी घातक आहे. खूप कमाल कामगिरी केली, आता त्याचा आनंद लुटा. बुमराहविषयी तर काही न लिहिणचं चांगलं आहे. चॅम्पियन बॉलर”

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. गट टप्प्यात संघाने सलग चार सामने जिंकून सुपर-८ मध्ये स्थान मिळवलं. पण सुपर-८ मधील दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिलाच सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर टीम इंडिया स्पर्धेबाहेर होणार का अशी चिंता होती. पण पुढील दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत मोठा विजय मिळवला आणि सेमीफायनल गाठली. यानंतर इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये पराभव करत फायनलमध्ये न्यूझीलंडला नमवलं आणि टी-२० विश्वचषक ट्रॉफी घरच्या मैदानावर जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं.