वृत्तसंस्था, नवी दिल्ली : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये केवळ ‘इम्पॅक्ट प्लेयर’ अर्थात ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून खेळण्यास इच्छुक नाही. त्यासाठी त्याने स्पष्ट नकार दिला असून खेळत राहिलो, तर पूर्णवेळ यष्टिरक्षक-फलंदाज म्हणूनच खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे चेन्नई सुपर किंग्ज संघातील धोनीचा माजी सहकारी सुब्रमण्यम ब्रदीनाथने सांगितले.

धोनीने भारतीय क्रिकेट आणि ‘आयपीएल’मध्ये आपल्या नेतृत्वासह यष्टिरक्षणाची वेगळी छाप पाडली आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच चेन्नईने विक्रमी पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. मात्र, वाढते वय आणि शरीरावर येणारा ताण यामुळे गेल्या काही हंगामांपासून त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत केवळ ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून खेळण्याचा पर्याय ४५ वर्षीय धोनीसमोर आहे. यामुळे त्याला यष्टिरक्षण करावे लागणार नाही आणि तो केवळ फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकेल. मात्र, खेळलो तर पूर्ण ताकदीनेच खेळणार अशी धोनीची भूमिका असल्याचे बद्रीनाथने आपल्या ‘यूट्युब’ वाहिनीवर सांगितले.

‘‘धोनीने स्वत: मला सांगितले आहे की, तो प्रभावी खेळाडू म्हणून खेळणार नाही. त्याच्या मते, तो पूर्णवेळ यष्टिरक्षक आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण २० षटके मैदानावर राहायचे आहे,’’ असे बद्रीनाथ म्हणाला. मात्र, धोनीने आपल्या भूमिकेबाबत पुनर्विचार करून ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून खेळावे, असे बद्रीनाथला वाटते.

‘‘धोनीचे शरीर आता पूर्वीइतका ताण सहन करू शकत नाही. चेन्नईचे माजी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही याबाबत भाष्य केले होते,’’ असे बद्रीनाथ म्हणाला. पायाची दुखापत आणि तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे धोनी ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात एकही सामना खेळू शकला नाही.