IPL 2026 MS Dhoni Viral Video: आयपीएल २०२६ ला दणक्यात सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या ५ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स या संघांनी विजयाचं खात उघडलं. पण यादरम्यान पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार धोनी दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला होता. पण आता आनंदाची गोष्ट म्हणजे धोनी पुढील सामन्यासाठी संघात दाखल झाला आहे आणि सरावादरम्यानचा त्याचा एक व्हीडिओही व्हायरल होत आहे.
कॅप्टन कुल एम एस धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो फक्त महान क्रिकेटपटूच नाही, तर उत्तम माणूसही आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सराव सत्रादरम्यान धोनीने सपोर्ट स्टाफमधील एका व्यक्तीप्रती दाखवलेल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून माहीच्या साधेपणा आणि नम्र स्वभावाचं कौतुक केलं जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये “कोडी अण्णा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टाफ सदस्याने सरावादरम्यान धोनीची किट बॅग उचलण्यासाठी पुढे सरसावला. मात्र धोनीने त्या स्टाफ सदस्याला अत्यंत नम्रपणे नकार दिला आणि बॅग डाव्या हातातून उजव्या हाताकडे वळवली आणि पुन्हा चालू लागला. हा संपूर्ण प्रसंग एका प्रेक्षकाने पाहिला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणातच तो व्हायरल झाला आणि भारतीय क्रिकेटच्या या सुपरस्टारच्या साधेपणाचं पुन्हा एकदा चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं. चेपॉकच्या मैदानावरील हा व्हीडिओ आहे.
धोनीच्या पायाच्या पोटरीमध्ये दुखापत झाल्याने धोनी दोन आठवडे आयपीएल सामने खेळू शकणार नसल्याची माहिती फ्रँचायझीकडून देण्यात आली. पहिल्या सामन्यादरम्यान धोनी संघाच्या ड्रेसिंग रूममध्येही उपस्थित नव्हता. पण आता सरावाकरता धोनी सीएसके संघात दाखल झाला आहे. चेपॉकवरील सराव सत्रात धोनी सराव करताना दिसला.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सोशल मीडियावरूनदेखील एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये धोनी कोडी अण्णाला म्हणाताना दिसत आहे की, तू यांचं काही ऐकू नकोस, माझ्यासोबत चल आणि तितक्यात माही त्यांच्या खांद्यावर हात टाकून चालू लागतो.
