MS Dhoni Team Photo Session Video: चेन्नई सुपरर किंग्सचा गट टप्यातील घरच्या मैदानावरील अखेरचा सामना आज १८ मे रोजी खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. एम एस धोनी चेन्नईच्या मैदानावर हा सामना खेळत निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा होती. पण धोनी फिट नसल्याने हा सामना खेळत नाहीये. धोनी संघासोबत चेपॉकच्या मैदानावर मात्र उपस्थित आहे. यादरम्यान फोटोसेशन दरम्यानचा धोनीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
धोनीने २०२१ मध्ये मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला चेन्नईच्या मैदानावर अखेरचा आयपीएल सामना खेळत निवृत्ती घ्यायची आहे. धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये पोटरीच्या दुखापतीमुळे एकही सामना खेळला नव्हता. पण हैदराबादविरूद्धच्या सामन्यापूर्वी धोनी फिजिओशिवाय चांगला सराव करत होता, त्यामुळे हा सामना तो खेळेल अशी आशा होती. पण ऋतुराज गायकवाडने नाणेफेकीदरम्यान माहिती देत सांगितलं की तो फिट नसल्यामुळे खेळणार नाही.
चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १८० धावा केल्या. यानंतर दोन डावांच्या मधल्या वेळेत धोनी संपूर्ण संघासह मैदानावर उपस्थित होता. धोनी संपूर्ण संघासह टीम फोटोसाठी मैदानावर होता. धोनीला मैदानावर आलेला पाहताच चाहत्यांच्या आनंदाला पारवार नव्हता. पण धोनीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, तो भावुक झालेला दिसत होता.
धोनीच्या टीम फोटो सेशननंतरच्या कृतीने दिले निवृत्तीचे संकेत
धोनी दुखापतीमुळे चेन्नईच्या एकाही सामन्यात तो संघासोबत नव्हता. पण अखेरच्या सामन्यासाठी धोनी संघासह ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित आहे. यावरूनही धोनी सामन्यानंतर निवृत्ती घेईल अशा चर्चा आहेत. याशिवाय फोटो सेशननंतर धोनी मैदानावरून बाहेर जातानाही मान खाली घालून भावुक होत मैदानाबाहेर जात होता. बाऊंड्रीलाईनच्या पलीकडे गेल्यावर धोनीने मागे वळून उजवीकडे पाहिलं. धोनी फलंदाजीला येताना नेहमी त्याच्या डाव्या दिशेला सूर्याकडे पाहत मैदानावर पाऊल टाकतो. पण यावेळेस मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याने मागे वळून त्याच दिशेला पाहिलं. धोनीच्या या कृतीने चाहते भावुक झाले.
याशिवाय कॉमेंटेटर असलेले बरेच माजी खेळाडू धोनी पुन्हा आयपीएलमध्ये मैदानावर खेळताना दिसणार नाही, तो आज निवृत्त होईल असं सांगताना दिसले.
