भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, आजही तो जगभरातील लाखो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. धोनी मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या आयुष्यात आपल्या शांत आणि संयमी वागणुकीसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत आपल्या एकाही चाहत्याला निराश केलेले नाही. कायम आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करणारा धोनी नुकताच आपल्या एका विशेष दिव्यांग चाहतीला भेटला. त्याच्या या कृतीमुळे त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

महेंद्रसिंह धोनीने रांची विमानतळावर लावण्या पिलानिया या दिव्यांग मुलीची भेट घेतली. धोनी चेन्नईला जाण्यासाठी रांची विमानतळावर होता तेव्हा त्याची खास चाहती असलेल्या लावण्याशी भेट झाली. त्याने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून या खास मुलीसाठी थोडा वेळ काढला आणि तिची इच्छा पूर्ण केली. स्वत: लावण्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत माहिती दिली.

एमएस धोनीला भेटून तिला कसे वाटले आणि तो किती चांगला व्यक्ती आहे, याबाबत लावण्याने पोस्ट केली आहे. “धोनीला भेटल्याची भावना मी शब्दात मांडू शकत नाही, तो दयाळू, गोड स्वभावाचा आणि मृदू बोलणारा आहे. त्याने मला माझ्या नावाचे स्पेलिंग विचारले. त्याने माझ्या हातात हात दिला. मला अश्रू अनावर झाल्यानंतर ‘रडू नकोस’ म्हणत त्याने माझे अश्रू पुसले. माझ्यासाठी हे क्षण निखळ आनंद देणारे होते”, असे लावण्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

लावण्याने आपल्या लाडक्या खेळाडूला त्याचे एक रेखाचित्र भेट दिले आहे. याबाबतही लावण्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘मी धोनीला त्याचे रेखाचित्र भेट दिले. त्याबद्दल त्याने माझे आभार मानले आणि ते चित्र घरी घेऊन जाईल असेही म्हटले. त्याचे हे शब्द मी कधीही विसरू शकणार नाही. त्याने मला त्याचा अमूल्य वेळ दिला. तो किती चांगला आहे, हे मी त्याला सांगितल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मी कधीही विसरणार नाही. माझ्यासाठी ३१मे २०२२ हा दिवस फार विशेष ठरला आहे,’ असे लावण्या म्हणाली आहे.

दिव्यांग असलेली लावण्या महेंद्रसिंह धोनीची मोठी चाहती आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धोनीसाठी तिने असंख्य पोस्ट केलेल्या आहेत. आता तिची आणि धोनीची प्रत्यक्ष भेट झाल्याने ती फारच आनंदी झाली आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या या कृतीमुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे.