भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अलीकडेच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीसोबत एका जाहिरातीचे शूटिंग करताना दिसला. धोनीने फिल्म सिटी, गोरेगाव, मुंबई येथे जाहिरात शूट केली. धोनीने मिर्झापूरचा ‘कालीन भैया’ म्हणजेच पंकज त्रिपाठीसोबत फोटोसाठी पोज दिली आहे. या दोघांचा फोटो पाहून नेटिझन्सची ‘एका फ्रेममध्ये दोन लीजेंड्स” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी धोनी आणि युवराज सिंग देखील एका फोटोत दिसले होते. युवराज सिंगच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे दोघे जाहिरातीच्या शूटिंगच्या संदर्भात भेटले होते. युवराज आणि धोनी सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलत असताना त्यांचा फोटो व्हायरल झाला होता.

काही दिवसांपूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात धोनीने सांगितले, ”मला शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्ये खेळायला आवडेल. मात्र, शेवटचा सामना आगामी आयपीएलमध्ये होईल किंवा पुढच्या पाच वर्षात होईल, हे माहीत नाही. मी नेहमीच माझ्या क्रिकेटचे नियोजन केले आहे. मी भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना रांची येथे खेळला होता. मी माझा शेवटचा टी-२० सामना चेन्नईत खेळण्याची आशा करतो.”

हेही वाचा – ASHES : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा विश्वविक्रम..! मलानला तंबूत धाडलं अन्…; पाहा VIDEO

पुढील हंगामासाठी चेन्नईने जडेजाला १६ कोटी आणि धोनीला १२ कोटी देत रिटेन केले आहे. जडेजा आणि धोनी व्यतिरिक्त सीएसकेने मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना कायम ठेवले आहे. अलीला ८ कोटी तर ऋतुराजला ६ कोटी मिळाले.