भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आघाडीची फळी कोसळल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाची पडझड रोखली. यावेळी केदार जाधवने ५४ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने केलेल्या ४० धावा खूपच निर्णायक ठरल्या. मात्र, स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर २२ व्या षटकात धोनी आणि केदार जाधव यांच्यातील ताळमेळ बिघडल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज स्टॉनियसचे षटक सुरू असताना हा प्रसंग घडला. कमालीच्या चपळाईने किंवा एखादी चोरटी धाव काढून प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यासाठी धोनी प्रसिद्ध आहे.

स्टॉनियसच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरही धोनीने अशाचप्रकारे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू टोलावल्यानंतर तो लगेच क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल, याची कल्पना असल्यामुळे धोनीने लगेच क्रीज सोडले. स्टॉयनिसच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीनं चेंडू टोलवून धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. परंतु, तो निम्म्या क्रिजमध्ये आला तरी केदार क्रिज सोडून फक्त धोनीकडं पाहातच उभा राहिला होता. सुदैवाने यावेळी हिल्टन कार्टराईटनला स्टम्पचा अचूक वेध घेता आला नाही. त्यानंतर केदार जाधवने कशीबशी ही धाव पूर्ण केली. मात्र, धोनी थोडक्यात बचावला. यावेळी धोनी अवघ्या ७ धावांवर खेळत होता.

धोनीला मिळालेले हे जीवनदान भारतीय संघासाठी खूपच फायदेशीर ठरले. भारतीय संघ इतक्या नाजूक स्थितीत असताना ही चूक संघासाठी फार महागात पडू शकली असती. त्यामुळेच ही धाव पूर्ण झाल्यानंतर धोनीने केदार जाधवकडे रागाने बघितले. या प्रसंगातून केदार जाधवला नक्कीच योग्य तो संदेश मिळाला असेल. मात्र, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर केदार जाधव बाद झाला. स्टॉनियसचा चेंडू हुक करण्याच्या नादात तो झेलबाद झाला. यावेळी भारताची धावसंख्या ५ बाद ८७ अशी होती. यानंतर धोनीनं हार्दिक पांड्याच्या साथीने भारताला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. घरच्या मैदानावर खेळताना धोनीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले.