आलिशान कार सोडून धोनीचा झारखंडच्या खेळाडूंसोबत ट्रेनने प्रवास

धोनी याआधी रणजी सामन्यावेळी झारखंडच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होता

धोनीने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर झारखंडच्या संघ सहकाऱयासोबतच एक फोटो पोस्ट केला.

भारतीय कसोटी संघ गुरूवारपासून ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतलेली असल्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून सध्या तो दूर आहे. राष्ट्रीय संघात सध्या धोनीचा समावेश नसला तरी तो क्रिकेटपासून काही दूर राहिलेला नाही. आगामी विजय हजारे स्पर्धेसाठी धोनीकडे झारखंडच्या संघाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिश्मा सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे धोनीचे नेतृत्त्व झारखंडसाठी खूप उपयुक्त ठरेल यात काहीच शंका नाही. धोनीच्या उपस्थितीमुळे संघातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल.

धोनी याआधी रणजी सामन्यावेळी झारखंडच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होता. नुकतेच धोनीने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर झारखंडच्या संघ सहकाऱयासोबतच एक फोटो पोस्ट केला. महत्त्वाची बाब अशी की धोनीने यावेळी आपल्या आलिशान कारमधून प्रवास करण्याऐवजी संघातील खेळाडूंसोबत ट्रेनने प्रवास केला. धोनीला असलेली बाईक्स आणि कारची आवड सर्वज्ञात आहे. धोनीच्या ताफ्यात अनेक स्पोर्ट्स बाईक आणि आलिशान गाड्यांचा समावेश आहे. झारखंडमध्ये सामना असताना संघाच्या बसमधून जाण्याऐवजी धोनीने आपल्या आलिशान कारमधून प्रवास करणे पसंत केल्याचे आपण याआधीही पाहिले आहे. पण यावेळी झारखंडचे युवा खेळाडू ट्रेनने प्रवास करणार असल्याने धोनीनेही आपली स्वत:ची कार टाळून संघ सहकाऱयांसोबत ट्रेननेच प्रवास केला. झारखंडचा संघ विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी कोलकाताकडे रवाना होतानाचा हा फोटो आहे. कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर विजय हजारे करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. येत्या २५ तारखेपासून स्पर्धेला सुरूवात होणार असून २६ फेब्रुवारीला झारखंडचा छत्तीसगडसोबत सामना होणार आहे.

A post shared by @mahi7781 on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ms dhoni travels in train with jharkhand team mates