निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याने १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांना आवाहन केलं आहे. धोनीने तरूणांना मतदार यादीत नाव नोंदवण्यास सांगितलं आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडून देण्यास मदत होते. निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवरून धोनीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

“१८ वर्षे पूर्ण होताच आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करा आणि मतदानासाठी तयार व्हा. हीच आपली खरी शक्ती आहे. याचा वापर करा.”; असा संदेश महेंद्रसिंह धोनी देताना दिसत आहे.

धोनी डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. याव्यतिरिक्त फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात बंगळुरूमध्ये धोनीनं अखेरचा टी-२० सामना खेळला. तर विश्वचषक सामन्यांच्या उपांत्य फेरीतील सामना हा त्या अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. विश्वचषक सामन्यांनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. परंतु त्यावेळी धोनी टेरिटोरियल आर्मी युनिटसह १५ दिवस काश्मीरमध्ये होता. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान तो काश्मीरमध्ये तैनात होता. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती.