भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला. निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर त्याच्या क्रिकेटमधील योगदानाला केवळ क्रीडाविश्वातूनच नव्हे, तर सर्व स्तरांतून सलाम करण्यात आला. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर, वासिम अक्रम, बाबर आझम यासाऱ्यांचाही त्यात समावेश होता. त्यानंतर आता एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने धोनीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले.

“आजकालचे कर्णधार हे संघातील आपली जागा पक्की करण्याच्या दृष्टीने खेळत असतात. स्वत:चा फलंदाजीचा क्रमांक निश्चित करण्याच्या दृष्टीने कामगिरी करताना दिसतात. संघ जिकतोय की पराभूत होतोय याच्याशी त्यांनी काही घेणं देणं नसतं. संघ आणि देशासाठी असे कर्णधार खूपच दुर्दैवी ठरतात. पण धोनी मात्र अप्रतिम कर्णधार होता. उत्तम खेळाडू, प्रतिभावंत फलंदाज आणि जगात भारी असं नेतृत्व ही धोनीची बलस्थानं होती. धोनीसारखा कर्णधार पाकिस्तानलाही मिळायला हवा”, असे पाकिस्तानचा फलंदाज कामरान अकमल म्हणाला.

कामरान अकमल

“धोनीसारखे नि:स्वार्थी कर्णधार पाकिस्तानातही घडायला हवेत. सध्या कर्णधारांना माझी विनंती आहे की तुम्हीदेखील धोनीसारखं संघाचं नेतृत्व करण्याची तयारी दर्शवा. जोपर्यंत तुम्ही संघासाठी सर्वस्व पणाला लावणार नाही आणि संघासाठी विजयश्री खेचून आणणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या संघाला प्रगतीपथावर घेऊन जाता येणार नाही”, असेही तो म्हणाला.