भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज ७ जुलै रोजी ट्रेंट ब्रिज नॉटिंगहम येथे खेळवला जात आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आणि मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकत मालिका बरोबरीत करण्यावर संघाचं लक्ष्य असेल. आज भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवशी धोनी भारताचा सामना पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये हजेरी लावली आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक श्रेयस अय्यरने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह प्लेईंग इलेव्हनमध्ये रवी बिश्नोईच्या जागी प्रिन्स यादवचा संघात समावेश करण्यात आला आणि प्रिन्सने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. प्रिन्सने जोस बटलरला क्लीन बोल्ड करत पहिली विकेट मिळवली.
भारत-इंग्लंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी बर्थडे बॉय एम एस धोनी नॉटिंगहममध्ये उपस्थित आहे. सामन्यादरम्यान धोनीची झलक दिसताच चाहत्यांनी एकच कल्ला केला. धोनीचे फोटो आणि व्हीडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
