MS Dhoni Wife Sakshi Dhoni Celebration Viral Video: भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलमधील अटीतटीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. रोहित शर्मासह अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व हा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. हिटमॅनप्रमाणे कॅप्टन कुल एम एस धोनी वानखेडेच्या मैदानावर उपस्थित होता. सामन्यादरम्यान धोनीचा व त्याच्या पत्नीचा मजेशीर व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

एम एस धोनी व त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी भारताचा टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. धोनीची भेट घेण्यासाठी रोहित शर्मा व त्याची पत्नीदेखील पोहोचले होते. रोहित व धोनीने बराच वेळ एकमेकांशी बोलत सामन्यासंबंधित चर्चा करतानाचा व्हीडिओ पाहायला मिळाला होता. यानंतर अखेरच्या षटकांमध्येही धोनीकडे बरेचदा कॅमेरा नेण्यात आला, यादरम्यान धोनीच्या पत्नीचा सेलिब्रेशन करतानाचा आणि धोनीच्या त्यावरील भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

इंग्लंडला अखेरच्या षटकांमध्ये ४५ धावांची गरज होती. त्यावेळेस बुमराह १८वं षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा शतकवीर जेकब बेथल स्ट्राईकवर होता. त्यानंतर बुमराहने टाकलेला तो चेंडू डॉट बॉल ठरला. तर सॅमने टोलवलेला तो बंप पॉल बुमराहने एका हाताने टिपला, तितक्यात साक्षीला वाटलं की तो झेलबाद झाला आहे आणि साक्षीने जागेवरून उठत उड्या मारत सेलिब्रेशन केलं. तर धोनी टाळ्या वाजवत बुमराहच्या डॉट बॉलचं कौतुक करत होता.

साक्षी धोनीच्या सेलिब्रेशनचा व्हायरल व्हीडिओ पाहिला का?

साक्षीचं अचानक सेलिब्रेशन पाहता धोनीसह मागे उभे असलेले सर्व हसायला लागले. तितक्यात धोनीने ही बघ असे हातवारे करत तिला खाली बस खाली बस म्हणाला. यानंतर बाकीचे तिला विकेट नाहीये, असं सांगताना दिसले. तर अंबानींची धाकटी सूनदेखील तिच्याबरोबर चिअर करत आणि त्यानंतर तिच्याजवळ येऊन हसायला लागली होती. साक्षी आणि धोनीचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यादरम्यान भारताने इंग्लंडविरूद्ध सात धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तब्बल ४९९ धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २५४ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये संजू सॅमसनने पुन्हा एकदा शानदार खेळी करत ४२ चेंडूत ८९ धावा केल्या. त्याला हार्दिक पंड्या (१२ चेंडूत २७ धावा), इशान किशन (१८ चेंडूत ३९ धावा), तिलक वर्मा (७ चेंडूत २१ धावा) आणि शिवम दुबे (२५ चेंडूत ४३ धावा) यांनी महत्त्वपूर्ण साथ दिली.

इंग्लंडकडून जेबक बेथलने ४८ चेंडूत १०५ धावांची दमदार शतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाच्या विजयासाठी अपुरी ठरली आणि भारताने अखेर सात धावांनी सामना जिंकला. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह (१/३३) आणि हार्दिक पंड्या (२/३८) दोघांनी भेदक गोलंदाजी केली.