सध्या संपूर्ण जगभरात आयपीएलच्या सामन्यांनी चाहत्यांच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या सामन्यांमध्ये काही नवीन घडामोडी आपल्याला पहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी ३० मे रोजी इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. १५ एप्रिल रोजी बीसीसीआयची निवड समिती, मुंबईत विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करणार आहे. मात्र खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीचा विश्वचषकातील संघ निवडीशी कोणताही संबंध नसेल, असं निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. आयपीएलमधली कामगिरी विश्वचषकासाठी संघ निवडताना ग्राह्य धरली जाणार नाही. मात्र एखाद्या खेळाडूची आयपीएलमधील दमदार कामगिरी रिक्त जागेसाठी निर्णयाक ठरु शकते. मात्र याची खात्री देता येत नाही, आम्ही आमची बाजू स्पष्ट केलेली आहे. India Today वाहिनीशी बोलत असताना प्रसाद यांनी ही माहिती दिली. १५ तारखेला होणाऱ्या बैठकीत विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माही हजर असणार असल्याचं कळतंय. याआधी भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मानेही, आयपीएलच्या कामगिरीवर विश्वचषकासाठीचा संघ निवडला जाऊ नये असं म्हटलं होतं. टी-२० षटकांच्या स्पर्धेतल्या कामगिरीचे निकष वन-डे क्रिकेटच्या कामगिरीसाठी लावणं अयोग्य असल्याचंही रोहित म्हणाला. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार आणि अतिरीक्त यष्टीरक्षक कोण असेल याबद्दल निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.