Mukesh Chaudhary Mother death: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यातील एका भावनिक प्रसंगाने सर्वच जण भावुक झाले. एल क्लासिको सामन्याची नाणेफेक मुंबईने जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. चेन्नईने संजू सॅमसनच्या शतकाच्या बळावर २०७ धावांचा डोंगर उभारला. चेन्नईच्या संघातील गोलंदाज मुकेश चौधरीच्या आईचं निधन झाल्यानंतरही तो मैदानावर खेळण्यासाठी संघात दाखल झाला होता. यानंतर गोलंदाजीत त्याने विकेट घेतल्यानंतर केलेल्या कृतीने सर्वांचे डोळे पाणावले.
हा सामना सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीच्या आई, प्रेम देवी, यांचं दीर्घ आजारानंतर निधन झालं. त्या जवळपास वर्षभर गंभीर आजारी होत्या आणि मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर या दुःखद बातमीला दुजोरा दिला आणि कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. यादरम्यान चेन्नईचा संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरला होता.
दु:खाचा डोंगर कोसळलेला असला तरी मुकेश चौधरीच्या निर्णयाने सर्वांनाच भावूक केलं. त्याने वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील झाला. हे पाऊल त्याच्या धैर्याचे, समर्पणाचे उदाहरण ठरले. मुकेशच्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. हे दृश्य भावूक करणारे होते आणि त्यातून संघातील एकजूटही दिसून आली.
मुकेश चौधरी यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाजीला उतरला. मुंबईचा फॉर्मात असलेला सलामीवीर स्ट्राईकवर होता. मुकेश चौधरी उत्कृष्ट सुरूवात करत सलग ४ डॉट बॉल टाकले. यानंतर पाचव्या चेंडूवर क्विंटन फटका खेळायला जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. मुकेशचा भेदक चेंडू क्विंटनच्या बॅटची कड घेत स्टंप्सवर आदळला. विकेट घेतल्यानंतर मुकेश चौधरीने आभाळाकडे पाहत आईला ही विकेट समर्पित करत तिचं स्मरण केलं.
मुकेशने विकेट घेताच सर्वजण त्याच्याजवळ येऊन त्याला मिठी मारत त्याचं कौतुक करताना दिसले. या विकेटनंतरच्या त्याच्या कृतीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
