Mukul Chaudhary Reveals Cricket Journey: ईडन गार्डन्सच्या मैदानावर मुकुल चौधरी नावाचं वादळ आलं होतं. मुकुल चौधरीने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध सामन्यात लखनौ संघाला ३ विकेट्सने थरारक विजय मिळवून दिला. लखनौच्या या विजयाचा हिरो ठरला मुकुल चौधरी. लखनौ १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने १२८ धावांवर ७ विकेट्स गमावले असताना फलंदाजीला आला आणि अर्धशतकी खेळी करत केकेआरच्या जबड्यातून निसटता विजय नोंदवला. या विजयानंतर मुकुल काय म्हणाला, जाणून घेऊया.

जेव्हा लखनौ संघ मोठ्या संकटात होता, तेव्हा मुकुल क्रीजवर उतरला. हार मानण्याऐवजी, त्याने जोरदार पुनरागमन करत अवघ्या २७ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावांची उत्कृष्ट खेळी केवी. आपल्या या खेळीत मुकुलने सात गगनचुंबी षटकार आणि दोन चौकार मारले. या खेळीदरम्यान त्याने लगावलेल्या हेलिकॉप्टर शॉटची सध्या चर्चा सुरू आहे. कोलकाताविरुद्धच्या त्याच्या या धडाकेबाज खेळीनंतर, मुकुलला त्याच्या कामगिरीबद्दल आणि तयारीबद्दल विचारण्यात आलं.

लग्न व्हायच्या आधीच वडिलांनी मुलाला क्रिकेटर करायचं ठरवलेलं! मुकुल चौधरीचा क्रिकेट प्रवास

सामन्यानंतर बोलताना मुकुलने आपल्या क्रिकेट प्रवासाच्या सुरुवातीपासून ते कोलकाताविरुद्धच्या खेळीपर्यंतच्या प्रवासाचं अगदी साध्या पद्धतीने उत्तर दिलं आणि क्रिकेट खेळून तो वडिलांचं स्वप्न पूर्ण करत असल्याच देखील त्याने सांगितलं. मुकुल म्हणाला, “माझा प्रवास खरं तर माझ्या जन्मापूर्वीच सुरू झाला. माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की एक दिवस त्यांचा मुलगा क्रिकेट खेळेल. पण त्या वेळी आमची आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती, त्यामुळे मला बालपणी क्रिकेट खेळायला सुरुवात करता आली नाही. मी साधारण १२-१३ वर्षांचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्या काळात फारशा अकॅडमी नव्हत्या. सिकेरमध्ये SBS क्रिकेट अकॅडमी नुकतीच सुरू झाली होती आणि मी तिथे ५-६ वर्षे प्रशिक्षण घेतलं.”

“यानंतर मी जयपूरला गेलो, कारण उच्च स्तरावर खेळायचं असेल तर पुढे जाणं आवश्यक होतं. गेली चार वर्षे मी जयपूरमध्ये सराव करत आहे. मागच्या वर्षी मला जाणवलं की टी-२० क्रिकेट खूप वेगाने पुढे सरकत आहे, विशेषतः या स्तरावर, त्यामुळे मला अधिक मॅच खेळण्याच्या अनुभवाची गरज होती. मी ३-४ महिने गुरुग्राममध्ये राहिलो आणि दिल्लीत सामने खेळलो, ज्यामुळे मला जलद गतीच्या क्रिकेटशी जुळवून घेण्यास खूप मदत झाली. हा माझा प्रवास आहे.”

मुकुलला विचारण्यात आलं की तुझ्या वडिलांना कधी वाटलं की तू क्रिकेटमध्ये काहीतरी मोठं करू शकतोस, यावर तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला एक अंडर-१९ सामन्याबद्दल सांगितलं, जो यूपीविरुद्ध होता. जो कमी धावसंख्येचा सामना होता, त्यात इतर कोणी विशेष कामगिरी केली नव्हती, पण मी धावा केल्या. त्यादिवशी त्यांना विश्वास वाटला की मी पुढे जाऊ शकतो.”

दडपणाखाली खेळण्याबद्दल मुकुल म्हणाला, “हो, सर, दडपण असतंच. पण मला वाटतं की देवाने मला ही संधी दिली आहे, त्यामुळे मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला. ही अशी संधी आहे जिथे तुम्ही मोठं काहीतरी करू शकता किंवा स्वतःचं नाव कमवू शकता. त्यामुळे मी दडपणावर नाही, तर संधीवर लक्ष केंद्रित करतो.”

अखेरच्या षटकातील मॅचविनिंग षटकारापूर्वी मुकुलच्या मनात काय सुरू होतं?

शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूपूर्वी मुकुलच्या मनात नेमकं काय सुरू होतं, हे सांगताना तो म्हणाला, “माझा हाच विचार होता की गोलंदाजाने जर चार परफेक्ट चेंडू टाकले, तर किमान एक चेंडू तरी माझ्या एरियात येईल. मला फक्त एक चेंडू हवा होता सिक्स मारण्यासाठी. मी त्या चेंडूची वाट पाहत होतो, तो शेवटून दुसरा किंवा शेवटचा चेंडूही असू शकतो. पण मला खात्री होती की षटकारासाठी मला एक चेंडू नक्की मिळेल.”