Mukul Chaudhary Helicopter Shot Video: लखनौ सुपर जायंट्स संघाला मुकुल चौधरी या नव्या ताऱ्याने दणदणीत विजय मिळवून दिला आहे. मुकुल चौधरीने केकेआरच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरत लखनौला थरारक विजय मिळवून दिला. लखनौने अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला मुकुल चौधरी. ज्याने सामन्यादरम्यान एकापेक्षा एक मोठे षटकार खेचले. यापैकी त्याने लगावलेला हेलिकॉप्टर शॉट सध्या चर्चेत आहे.
१८२ धावांचं लक्ष्य गाठताना लखनौची सुरुवात खूप खराब झाली. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श लवकर बाद झाले. ऋषभ पंत आणि निकोलस पूरन हेही फार काळ टिकले नाहीत. १५.६ षटकांत लखनौची धावसंख्या ७ बाद १२८ धावा अशी होती आणि सामना केकेआरच्या बाजूने झुकलेला दिसत होता. पण तिथून पुढे मुकुल चौधरीने संघाचा डाव उचलून धऱत थेट विजय मिळवून माघारी परतला. मुकुल चौधरीने अवघ्या २७ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ५४ धावा ठोकल्या. या नऊ फटक्यांनी केकेआरचा पराभव निश्चित केला.
मुकुल चौधरीने १७व्या षटकातील वैभव अरोराच्या चौथ्या चेंडूवर दणदणीत हेलिकॉप्टर शॉट लगावला. मुकुलचा हा षटकार पाहून सर्वांनाच धोनीची आठवण झाली. अगदी धोनीसारखा हुबेहूब मुकुलने षटकार खेचला. धोनीसारखा अगदी हुबेहूह फटका पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. त्याच्या या मॅचविनिंग खेळीबरोबरच त्याच्या हेलिकॉप्टरची शॉटची चर्चा आहे.
कोण आहे मुकुल चौधरीचा आदर्श खेळाडू?
मुकुल चौधरी एम.एस. धोनीला आपला आदर्श मानतो आणि एक शांत फिनिशर व विश्वासार्ह यष्टीरक्षक म्हणून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं करियर घडवण्याचा त्याचा मानस आहे. केकेआरविरुद्धच्या आपल्या मॅचविनिंग खेळीने या युवा खेळाडूने भविष्यात लखनौसाठी एक महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो याचे संकेत दिले आहेत.
लखनौला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना मुकुलने एक धाव घेतली, त्यानंतर दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर दणदणीत षटकार खेचत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मुकुल चौधरी हा यष्टीरक्षक फलंदाज असून तो राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मधल्या षटकांमध्ये स्फोटक फलंदाजी करणं, ही त्याची भूमिका असून आज त्याने कामगिरी फत्ते करून दाखवली.
