हा मुलगा येत्या काही महिन्यात देशातला धोकादायक टी२० बॅट्समन होईल असं भाकीत लखनौ सुपरजायंट्सचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं. लखनौ सुपरजायंट्सने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हीडिओत लँगर संघाचा कर्णधार ऋषभ पंतशी बोलत होते. या मुलाकडे लक्ष ठेव, तो भविष्य आहे असं लँगर म्हणाले. गुरुवारी कोलकाताविरुद्ध मुकुल चौधरीने २७ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी करत लँगर यांचे शब्द खरे ठरवले.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये राजस्थानसाठी खेळणाऱ्या मुकुलसाठी लखनौने २.६ कोटी रुपये मोजले होते. लिलावात मुकुलचं नाव येताच लखनौचा संघ त्याला संघात घेण्यासाठी आतूर होता. लखनौ संघव्यवस्थापनाचा विश्वास मुकुलने सार्थ ठरवला. कोलकाताविरुद्धच्या लढतीत पराभव समोर दिसत असताना मुकुल खचला नाही. त्याने अवेश खानला साथीला घेत षटकारांची आतषबाजी केली. शेवटच्या षटकात दडपण वाढत असतानाही षटकार लगावण्याचं कौशल्य सिद्ध झालं.

राजस्थानमधल्या झुनझूच्या असणाऱ्या मुकुलसाठी हा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणी क्रिकेट खेळू शकला नाही. १२व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. झुनझू इथून सिकर आणि तिथून जयपूर अशी वाटचाल केली. कार्तिक शर्मा आणि अशोक शर्मा यांच्याप्रमाणेच मुकुल .. अकादमीचा विद्यार्थी आहे. टी२० खेळण्याचा सराव मिळावा यासाठी मुकुल गेल्या काही वर्षांपासून गुडगाव इथे खेळत आहे.

गेल्या वर्षी U23 स्पर्धेत मुकुलने ६००हून अधिक धावा केल्या. मुकुलने १४२च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या. यामध्ये दोन लागोपाठ शतकांचा समावेश आहे. मुकुलने या स्पर्धेत ३४ षटकारांची लयलूट केली.

‘त्याच्या डोळ्यात धावांची भूक दिसते. त्याला मी नेट्समध्ये खेळताना पाहिलं आणि मी अचंबित झालो. षटकार लगावण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. ज्या पद्धतीने षटकार मारताना त्याच्या शरीराचं वजन संक्रमित होतं, ज्या पद्धतीने त्याची बॅट फिरते ते पाहणं खास असतं. तो फक्त २१ वर्षांचा आहे. त्याचं भवितव्य उज्वल आहे. त्याचे गावकरी, कुटुंबाचं नाव तो मोठं करेल’, असं लँगर यांनी सामन्यानंतर बोलताना सांगितलं. लँगर यांनीच मुकुल देशातल्या धोकादायक टी२० फलंदाजांपैकी एक असेल असं भाकीत केलं होतं. अवघ्या काही दिवसात लँगर यांचं भाकीत खरं ठरलं आहे.