Mukul Choudhary Match winning inning: लखनौ सुपर जायंट्सचा मुकुल चौधरी हे नाव केकेआरविरूद्धच्या सामन्यानंतर सगळीकडे गाजतंय. मुकुल चौधरी लखनौचा निम्मा संघ परतल्यानंतर फलंदाजीला आला आणि अफलातून खेळी करत केकेआरच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. त्याने फक्त २७ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावा करत सामना जिंकून दिला. त्याने उत्कृष्ट खेळीचं श्रेय त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना दिलं आहे.
१८२ धावांचा पाठलाग करताना लखनौची अवस्था बिकट झाली होती. १३ षटकांत संघाचा स्थिती ५ बाद १०४ अशी होती. तेव्हा मुकुल फलंदाजीला आला. पुढे १६ षटकांत धावसंख्या ७ बाद १२८वर आली आणि शेवटच्या चार षटकांत ५५ धावांची गरज होती. दुसऱ्या टोकाला आवेश खान होता. विजयासाठी मुकुलकडून मोठी खेळी अपेक्षित होती आणि त्याने ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
१८व्या षटकात मुकुलने कार्तिक त्यागीला दोन षटकार खेचले. त्यानंतर पुढील षटकात कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर १६ धावा काढल्या. शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना मुकुलने वैभव अरोराविरूद्ध दोन षटकार मारत अखेरच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला. या शानदार खेळीनंतर मुकुलने सांगितलं की धोनी त्याचा आदर्श खेळाडू आहे. त्याने ही खेळी धोनी आणि आपल्या वडिलांना समर्पित केली.
“मी नेहमी पाहायचो की महेंद्रसिंग धोनी सामने कसे शेवटपर्यंत नेऊन जिंकवतो. मीही त्याच क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने मला प्रेरणा दिली. आज मी सामना जिंकवला आणि ही खेळी त्याला समर्पित करतो,” असे मुकुलने सामन्यानंतर सांगितले.
या खेळीत मुकुलने तब्बल सात षटकार खेचले. त्याने सांगितलं की तो रोज १०० ते १५० षटकार मारण्याचा सराव करतो. “माझ्या शरीरात नैसर्गिक ताकद आहे, पण त्यासोबत मी खूप सरावही करतो. रोज १०० ते १५० षटकार मारण्याचा सराव केल्याने ती क्षमता विकसित होते. गेल्या ५-६ महिन्यांपासून मी यावर विशेष मेहनत घेत आहे आणि त्याचा फायदा आता दिसत आहे,” असे मुकुल म्हणाला.
लखनौ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी सांगितलं की संघाने मुकुलला कसं शोधलं. त्यांच्या मते, संघाच्या डेटा विश्लेषकांनी प्रशिक्षण शिबिरादरम्यान मुकुलची क्षमता ओळखली आणि त्यानंतर लिलावात त्याला संघात घेण्यासाठी आग्रह धरला होता.
“काही महिन्यांपूर्वी एका प्रशिक्षण शिबिरात आम्ही त्याला पाहिलं होतं. तेव्हाच आम्ही त्याला हेरलं होतं. आपल्या देशात प्रचंड प्रतिभा आहे. आमचे डेटा विश्लेषक श्रीनिवास यांचं खास कौतुक करायला हवं, त्यांनी मला सांगितलं, ‘कोच, आपल्याला हा मुलगा घ्यायलाच हवा.’ आणि आम्ही त्याला संघात घेतलं, हे आमचं भाग्यच होतं,” असं लँगर यांनी संघाच्या विजयानंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. लखनौ सुपर जायंट्सने चौधरीसाठी २.६० कोटी रुपये मोजले होते.
