KKR vs LSG Highlights: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ४ गडी बाद १८१ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. पण शेवटी लखनौच्या मुकुल चौधरीने सामना फिरवला. मुकुलने अर्धशतकी खेळी करून लखनौला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.

कोलकाता नाईट रायडर्सने लखनौसमोर विजयासाठी १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघाला हवी तितकी वेगवान सुरुवात मिळाली नाही. मिचेल मार्श आणि एडेन मारक्रमच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. एडेन मारक्रम २२ धावा करून माघारी परतला. तर मिचेल मार्शने अवघ्या १५ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या १० धावा करून माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या आयुष बदोनीने ५४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर निकोलस पूरन १३ धावा करून माघारी परतला. शेवटी मुकुल चौधरीने कोलकाताच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. चौकार – षटकारांचा पाऊस पाडून त्याने लखनौ सुपर जायंट्सला विजय मिळवून दिला.

मुकुल चौधरी चमकला

हा सामना लखनौच्या हातून जवळजवळ निसटला होता. पण मुकुल चौधरी हा कोलकाता नाईट रायडर्ससाठी सरप्राईज पॅकेजपेक्षा कमी नव्हता. ७ विकेट्स गेल्यानंतर कोलकाताने विजयाचा जल्लोष करायला सुरूवात केली होती. पण हा जल्लोष फार काळ टिकला नाही. मुकुलने चौकार- षटकारांचा पाऊस पाडला. त्याने २७ चेंडूंचा सामना करून नाबाद ५४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले.

कोलकाताने दिलं १८२ धावांचं आव्हान

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. सलामीला आलेला फिन अॅलेन अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला. पण अजिंक्य रहाणेने एक बाजू सांभाळली. त्याने २४ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली. अंगक्रिश रघुवंशीने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करून ३३ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. तर कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूत नाबाद ३२ धावांची खेळी केली. यासह कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद १८१ धावा केल्या.