Arjun Tendulkar On Mukul Choudhary:आयपीएल ही अशी स्पर्धा आहे, जी कुठल्याही खेळाडूला एका रात्रीत स्टार बनवू शकते. रिंकू सिंगसारखा फलंदाज एकाच षटकात ५ षटकार मारून चर्चेत आला होता. त्यानंतर भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. आता मूळचा राजस्थानचा असलेला आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग असलेला मुकुल चौधरी सध्या तुफान चर्चेत आहे. निमित्त ठरलं, कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध केलेली रेकॉर्ड ब्रेकिंग अर्धशतकी खेळी.

लखनौच्या चाहत्यांनी जिथे विजयाच्या आशा सोडून दिल्या होत्या, त्यावेळी फलंदाजीला येऊन त्याने ७ षटकार खेचले आणि शेवटच्या चेंडूवर लखनौला विजय मिळवून दिला. मुकुल चौधरी आयपीएल गाजवणार, असं भाकीत अर्जुन तेंडुलकरने आयपीएल सुरू होण्याआधीच केलं होतं.अर्जुन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत, मुकुल चौधरीचा उल्लेख केला होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

अर्जुन तेंडुलकरही झाला मुकुल चौधरीच्या फलंदाजीचा फॅन

अर्जुन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी शुभांकर मिश्रा या युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना त्याने मुकुल चौधरीचं कौतुक केलं होतं. अर्जुनला, असा कोणता फलंदाज आहे जो नेट्समध्ये षटकारांचा पाऊस पाडतो? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना क्षणाचाही विलंब न करता अर्जुनने मुकुल चौधरीचं नाव घेतलं. अर्जुन म्हणाला, “सराव सामन्यात त्याची फटकेबाजी पाहून मला खूप आनंद झाला. तो स्क्वेअर लेग, पॉईंट आणि अपर कटसह सर्वच फटके मारू शकतो.” अर्जुनने नेट्समध्ये मुकुल चौधरीला गोलंदाजी केली होती. त्याची फटकेबाजी मारण्याची क्षमता पाहून अर्जुनही अवाक् झाला होता.

अर्जुन तेंडुलकर गेल्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण आयपीएल २०२६ स्पर्धेआधी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला आणि लखनौने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपयात आपल्या संघात स्थान दिलं. तर याच लिलावात लखनौने २.६० कोटी रुपये मोजून आपल्या संघात स्थान दिलं.

मुकुल चौधरी ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी सुरुवातीच्या ८ चेंडूत त्याला केवळ २ धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर त्याने एकापाठोपाठ ७ गगनचुंबी षटकार खेचले. यादरम्यान वैभव अरोराच्या गोलंदाजीवर त्याने हेलिकॉप्टर शॉट खेचला. शेवटच्या षटकात लखनौल विजयासाठी १४ धावा करायच्या होत्या. मुकुल शेवटपर्यंत उभा राहिला आणि लखनौला विजय मिळवून दिला.