Mukul Choudhary Untold Story Reveals By Father: ज्या पित्याने आपल्या मुलाच्या जन्माआधीच त्याच्या हातात बॅट पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, त्या वडिलांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू तरळले. मुकुल चौधरीने मैदानावर मारलेला तो ‘हेलिकॉप्टर शॉट’ आणि मिळालेला विजय पाहून त्याच्या वडिलांनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. लखनौ सुपर जायंट्स आणि केकेआरमधील सामन्यानंतर मुकुल चौधरीचं नाव सध्या सगळीकडे चर्चेत आहे. यादरम्यानच त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.

लहानपणापासूनच मुकुलच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. वडिलांवर घर विकण्याची वेळ येणं, चांगल्या क्रिकेट अकॅडमीचा शोध घेताना केलेला संघर्ष, कर्जदारांचे सततचे तगादे, अगदी वडिलांना तुरुंगवास भोगावा लागणं, या सगळ्यामुळे त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लखनौ संघाचा भाग असलेल्या मुकुलला सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्यात धावांचा पाठलाग करताना फलंदाजीत सूर गवसला नाही आणि अखेरीस कर्णधार ऋषभ पंतने मैदानावर येत संघाला विजय मिळवून दिला. विजयी फटका मारल्यानंतर ऋषभ पंत मुकुलशी चर्चा करत त्याचा आत्मविश्वास वाढवताना दिसला होता.

मुकुल चौधरीच्या वडिलांनी सांगितली लेकाच्या क्रिकेटमागची अनटोल्ड स्टोरी

हैदराबादविरूद्ध सामन्यानंतरही टीम हॉटेलमध्ये परतल्यानंतर हा तरुण आपल्या भावना आवरू शकला नाही. झुंझुनूमधील आपल्या घरी बसून सामना पाहत असलेल्या वडील दलीप यांनी व्हिडिओ कॉलदरम्यान लाल झालेले मुलाचे डोळे पाहिले. “मी त्याला विचारलं, ‘बेटा, रडलास का?’ तो मान हलवत नकार देत हसला,” असं चौधरी यांनी सांगितलं.

“तो सामना पूर्ण करू शकला नाही याची त्याला खूप खंत वाटत होती. तो वारंवार म्हणत होता की लखनौने त्याच्यावर इतके पैसे खर्च केले, पण जर तो संघासाठी सामने जिंकू शकत नसेल तर त्याचा काय उपयोग? तो खूप खचला होता. त्याने मला वचन दिलं की पुढच्या सामन्यात तो सगळ्यांचा अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल आणि त्याने ते वचन पूर्ण करून दाखवलं,” असं मुकुलच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

मुकुल चौधरीचं कुटुंब हे राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील खेडारो की ढाणी या छोट्या गावातील आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाने लिलावात त्याला २.६० कोटी रुपयांना विकत घेतलं. जी किंमत त्याच्या मूळ किमतीच्या १३ पट होती. तेव्हा त्याने सर्वप्रथम आपल्या वडिलांना दिलेलं वचन हे क्रिकेटसाठी घेतलेलं कर्ज फेडण्याचं होतं. त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नासाठी वडिलांनी स्वतःचं घरही विकलं होतं.

“मी २००३ साली पदवीचं शिक्षण घेतलं, त्याच वर्षी माझं लग्न झालं. माझं एक स्वप्न होतं. जर मला मुलगा झाला तर तो क्रिकेटपटू व्हावा. पुढच्याच वर्षी मला मुलगा झाला आणि लहानपणापासूनच मी ठरवलं की त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी मी सर्व काही करेन. जेव्हा इतके लोक यशस्वी होऊ शकतात, मग माझा मुलगा का नाही?” असे त्यांनी आठवण सांगितली.

मुकुल चौधरीच्या वडिलांना तुरूंगात का जावं लागलं होतं?

सहा वर्षे दलीप चौधरी यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेसाठी तयारी केली, पण त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी मालमत्ता व्यवहाराचा व्यवसाय सुरू केला, पण तोही अपयशी ठरला. २०१६ साली, चांगल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या शोधात वडील आणि मुलगा सुमारे ७० किलोमीटर दूर सिकर येथे एसबीएस क्रिकेट केंद्रात पोहोचले. “त्याला तिथे प्रवेश दिल्यानंतर मला कळलं की माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझं नियमित उत्पन्न नव्हतं, त्यामुळे मी घर विकण्याचा निर्णय घेतला. मला २१ लाख रुपये मिळाले. सर्व व्यवहार नोंदीत राहावेत म्हणून मी खरेदीदाराला संपूर्ण रक्कम माझ्या खात्यात टाकण्यास सांगितलं. पुढच्या वर्षी मी एक हॉटेल सुरू केलं आणि त्यासाठी पुन्हा कर्ज घेतलं. हो, मी वेळेवर हप्ते भरू शकलो नाही. मला तुरुंगातही जावं लागलं, पण मी कधीही फसवणूक केली नाही,” असं त्यांनी सांगितलं.

“माझे नातेवाईक मला सोडून गेले. त्यांनी मला वेडा म्हटलं. ‘स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता तुझ्या मुलाला तरी सोडून दे’, असं ते माझ्या तोंडावरच म्हणायचे. असं खूप काही लोक माझ्या तोंडावर बोलून गेले. पण यामुळे आमचं कुटुंब आणखी मजबूत झालं. त्या कठोर शब्दांनी माझा निर्धार आणखी पक्का झाला की मी योग्य मार्गावर आहे,” असे ते पुढे म्हणाले.

दलीप स्वतःही क्रिकेट खेळायचे, पण फक्त गावातील स्थानिक स्पर्धांपुरतेच. “माझ्यासाठी कपिल देव आणि सचिन तेंडुलकर हे आदर्श होते. लहानपणी मी त्यांचे सामने पाहत मोठा झालो. मी माझ्या मुलासोबत सचिनचे व्हिडिओ पाहायचो. पण २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, जेव्हा महेंद्रसिंग धोनीने विजयी षटकार मारला, तेव्हा तो धोनीचा चाहता झाला आणि त्याने माझ्याकडे ग्लोव्हज मागितले,” अशी आठवण दलीप यांनी सांगितली.