आयपीएलचे सामने हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आयपीएलचे सामने महाराष्ट्रातून हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ख्यातनाम वकील कपिल सिबल यांनी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि शिवा कीर्ती सिंग यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल केली असून, २५ एप्रिलला याबाबत सुनावणी होणार आहे.
एमसीए मैदानासाठी पिण्यायोग्य पाणी नव्हे, तर प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणार असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने १३ एप्रिलला झालेल्या सुनावणीत ३० एप्रिलनंतरचे सर्व आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा निर्णय दिला. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यातील १ मेच्या सामन्याला फक्त परवानगी देण्यात आली आहे. तसेच २९ मे रोजी मुंबईत होणारा अंतिम सामनासुद्धा आता महाराष्ट्रात होणार नाही. मुंबई आणि पुणे या आयपीएलमधील दोन फ्रेंचायझींनी प्रत्येकी पाच कोटी रुपये मुख्यमंत्री दुष्काळ साहाय्य निधीसाठी देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.