रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघ आपापसात भिडलेले आहेत. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बेंगळुरूमध्ये खेळवले जात आहेत. मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात दुसरा उपांत्यपूर्व सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसरा दिवस मुंबईचा फलंदाज सर्फराज खानने आपल्या नावावर केला आहे. सर्फराजने १४० चेंडूंत धडाकेबाज शतक ठोकले आहे. त्याच्या या शतकी खेळीमध्ये ११ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. तो या रणजी हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सरफराजने आतापर्यंत ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. याबरोबरच तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

सर्फराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करताना त्याची सरासरी ८० पेक्षा जास्त होती. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९५.१४ च्या सरासरीने पहिल्या दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सरर्फराजचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे शतक आहे. गेल्या पाच डावांमध्ये त्याने १५६ च्या सरासरीने ६२४ धावा ठोकल्या आहेत.

हेही वाचा – Video : ना बुमराह ना मलिंगा, ‘या’ गोलंदाजाची अ‍ॅक्शन सोशल मीडियावर हीट

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सात सर्व शतकांमध्ये १५० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. सर्फराजने रणजी करंकाडमध्ये मागील १३ डावांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये एक तिहेरी शतक, तीन द्विशतके, पाचवेळा १५० हून अधिक धावा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलपूर्वी सर्फराजने ओडिशाविरुद्ध १६५ धावांची खेळी केली होती. असे असूनही, त्याला आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या दिल्लीच्या संघाकडून पुरेशी संधी मिळाली नाही. मात्र, त्याचा सध्याचा फॉर्म आणि कामगिरी बघता लवकरच त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.