४२ रणजी जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई संघाने ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या लढतीत रेल्वेवर १०६ धावांनी विजय मिळवत चाहत्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली. अष्टपैलू तनुष कोटियन या विजयाचा शिल्पकार ठरला.

रेल्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अंगक्रिश रघुवंशी (७८), सर्फराझ खान (५५), आकाश आनंद (५२) आणि शम्स मुलानी (७१) या चौघांच्या अर्धशतकांच्या बळावर मुंबईने ३९६ धावांची मजल मारली. रेल्वेतर्फे हिमांशू संगवानने ४ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रेल्वेचा डाव २५९ धावांतच आटोपला. तनुष कोटियनने ४५ धावांत ७ विकेट्स पटकावत रेल्वेच्या डावाला खिंडार पाडलं.

मुंबईने दुसरा डाव २३४ धावांवर घोषित केला. दिव्यांश सक्सेनाने पहिलंवहिलं शतक झळकावलं. त्याने ८ चौकार आणि एका षटकारासह १०० धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वाल भारतीय संघाचा भाग असल्याने तर आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त झाल्याने दिव्यांशला संधी मिळाली.  अंगक्रिशने ७९ धावांची आक्रमक खेळी केली. या दोघांनी १४६ धावांची सलामी दिली. मुंबईने रेल्वेला ३७२ धावांचं लक्ष्य दिलं.

रेल्वेतर्फे इशान गोएलने ११ चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची खेळी केली. झुबैर अलीने १४ चौकार आणि ५ षटकारांसह ११५ धावांची खणखणीत खेळी केली. मात्र या दोघांचा अपवाद वगळता रेल्वेच्या बाकी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. रेल्वेचा दुसरा डाव २६५ धावांवर आटोपला आणि मुंबईने हा सामना १०६ धावांनी जिंकला. शम्स मुलानीने ४ तर मुशीर खानने ३ विकेट्स घेतल्या. तनुष कोटियनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. त्यांचे २७ गुण झाले आहेत. रेल्वेने यंदा काही सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळायचं ठरवल्याने मुंबईला अवे लढत असूनही मुंबईत खेळता आलं. रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा १७ जानेवारीपासून सुरू होईल.