मिहीर वसावदा
मुंबई आणि ठाण्यातल्या मैदानांवर क्रिकेटची धुळाक्षरं गिरवणारे विनय अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानच्या महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. सलामीच्या लढतीत जपानच्या संघासमोर भारताचं आव्हान आहे.
उमेदवारीच्या काळात विनय ठाण्याहून पहाटे लोकल ट्रेनने मुंबईत येत असत. चर्नी रोडच्या पोलीस जिमखाना इथे ते सकाळी ७.१५वाजता पोहोचत. त्यानंतर सराव, मग कॉलेज आणि कॉलेज संपल्यावर पुन्हा एकदा सराव असा त्यांचा दिनक्रम असे. कॉलेज संपल्यावर ऑफिस सुरू झालं. सराव, अंधेरीत ऑफिस, मग पुन्हा सराव आणि मग ठाण्याला घरी रवाना असं त्यांचं रुटीन झालं. काही वर्ष विनय यांचं हेच वेळापत्रक होतं. पण नियतीच्या मनात वेगळं काहीतरी होतं.
मुंबईतल्या मैदानांवर घाम गाळत स्वत:ला सिद्ध करणारे विनय आता जपानमध्ये एका नवख्या संघाला तय्यार करत आहेत. ‘मी मागे वळून पाहतो तेव्हा मलाही आश्चर्य वाटतं. भारताविरुद्धच्या सामन्यात मी जपानचा प्रशिक्षक असेन असं कधीच वाटलं नव्हतं. दडपण येतं पण मी ते खेळाडूंसमोर दाखवत नाही’, असं विनय सांगतात.
ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम स्टेडियमवर शेखर धुरी यांच्या तालमीत विनय तयार झाले. वेस्ट झोनच्या सामन्यात चेतेश्वर पुजाराला अगदी जवळून बॅटिंग करताना त्यांनी पाहिलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं. पहिली गोष्ट करावी लागली ते म्हणजे रजेसाठी अर्ज करणे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी एका राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक असेन आणि त्यासाठी रजा घ्यावी लागेल असा विचारच केला नव्हता.
विनय कांगा लीग स्पर्धेत सुंदर क्रिकेट क्लबकडून खेळले आहेत. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वातील संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. माजी खेळाडू अशोक मंकड यांनी विनय यांना रणजी स्पर्धेत खेळ अशी सूचना केली. नौदल अर्थात सर्व्हिसेच्या माध्यमातून खेळण्याचा पर्याय मागे पडला. नोकरी करावी लागणारे हे दिसत होतं. मंकड यांनी केरळ संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला. मात्र केरळमध्ये खेळायचं तर सगळंच बदलेल असं वडिलांनी सांगितलं.
मंकड यांनी एक सुवर्णमध्य काढला. रोसी ब्ल्यू ही एक डायमंड ट्रेडिंग कंपनी आहे. टाईम्स शिल्ड स्पर्धेत त्यांचा संघ खेळतो. प्लेइंग कॉन्ट्रॅक्ट की नोकरी यामध्ये विनय यांनी नोकरीचा पर्याय स्वीकारला. पण त्यांचं क्रिकेट थांबलं नाही. रोसी ब्ल्यू कंपनीने २००९ मध्ये त्यांना तीन महिन्यांसाठी जपानला पाठवलं. २०११ मध्ये टोकियोत झालेल्या भूकंपातून ते वाचले. त्यानंतर २०१३ मध्ये तिथे कायमस्वरुपी कामाचा प्रस्ताव कंपनीने दिला. जपानमध्ये क्रिकेट खेळलं जातं हे त्यांना उमगलं. त्यांनी टोकियोतल्या मॅक्स सीसी क्लबमध्ये जायला सुरुवात केली. रोज दोन तास जाण्यायेण्यात जात असत. २०१५ मध्ये क्लबकडून खेळताना त्यांनी सर्वाधिक धावा केल्या. प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार पटकावला. जपानकडून खेळणार असं वाटत असतानाच सरकारने विदेशी खेळाडूंसाठीचा नियम बदलला.
मायदेशी परतण्याऐवजी विनय यांनी कावासाकी नाईट रायडर्स सुरु केलं. सीनिअर संघ उभा करायचा तर आधी युवा संघ तयार करावा लागेल हे विनय यांच्या लक्षात आलं. १२, १५, १९ वर्षांखालील संघांना तयार करायचं म्हणजे प्रशिक्षण आलं. यातूनच विनय यांना करिअरचा दुसरा टप्पा सापडला.
कोरोनानंतर जपानने विदेशी खेळाडूंसाठीचा नियम बदलला. विनय यांनी २०२१ मध्ये जपानसाठी पदार्पण केलं. खांद्याच्या दुखापतीमुळे विनय यांना खेळणं सोडावं लागलं. प्रशिक्षणाचा मार्ग स्वीकारला. जपानच्या १६ वर्षांखालील संघ, त्यानंतर १९ वर्षांखालील संघांना मार्गदर्शन केलं.
१९ वर्षांखालील संघाच्या दुबई दौऱ्यादरम्यान त्यांची वासिम जाफरशी भेट झाली. पोलीस जिमखान्याकडून ते दोघे एकत्र खेळले आहेत. याच दौऱ्याच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमधल्या मोठ्या नावांशी त्यांचा परिचय झाला. जपानच्या महिला संघाचे प्रशिक्षक आर्डेन ऱ्हुहोड यांनी प्रशिक्षकपद सोडताना विनय यांच्या नावाची शिफारस केली. २०२५ मध्ये विनय, जपानच्या महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाले.
‘जपानमधलं क्रिकेट वेगळं आहे. आम्ही मॅट विकेट्सवर खेळतो. महिन्यातून एकदा कॅम्प असतो. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयारी म्हणून तीन आठवड्यांचा कॅम्प आयोजित केला. मुली अतिशय उत्साही आहेत’, असं विनय सांगतात. ग्राऊंड्समनच्या बरोबरीने खेळाडू सराव करू शकतील अशी खेळपट्टी विनय यांनी तयार केली. विनय आजही नोकरी करतात. खेळाडू सराव करतात, त्यांचा सराव कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला जातो. अॅपद्वारे त्यांना चित्रण पाठवलं जातं. ते पाहून फीडबॅक देतात.
‘क्रिकेट या खेळाडूंसाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे’, असं विनय सांगतात. ‘लोकलचा प्रवास करून मुंबईतल्या मैदानांवर खेळणारा मुलगा आता जपानमध्ये प्रवास करत सरावाच्या ठिकाणी पोहोचतो. भारतीय खेळाडूंना गोलंदाजी कशी करायची हे सांगतो हे माझ्यासाठी अनोखं आहे’, असं विनय सांगतात.
