मुंबईच्या क्रिकेटपटूंकडून वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशाचा विचार!

सचिन तेंडुलकरपुढे कर्णधारपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु सचिनने माझ्याऐवजी महेंद्रसिंह धोनीकडे नेतृत्व सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला.

वानखेडे स्टेडियमवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर विशेष अतिथी कक्ष आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर स्टॅण्डचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ, माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.

‘एमसीए’चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे गौरवोद्गार

मुंबई : मुंबईच्या क्रिकेटपटूंनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा नेहमी देशाचा विचार के ला, असे उद्गार मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

‘‘२००७ मध्ये राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले, तेव्हा दिलीप वेंगसरकर निवड समितीवर होते. त्या वेळी सचिन तेंडुलकरपुढे कर्णधारपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु सचिनने माझ्याऐवजी महेंद्रसिंह धोनीकडे नेतृत्व सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर जे घडले, तो इतिहास घडला,’’ अशा आठवणीसह पवार यांनी मुंबईच्या क्रिकेटचा गौरव केला. मुंबईच्या क्रिकेटमधील काही प्रश्नांबाबत कार्यकारिणी सदस्यांसह दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे पवार यांनी सांगितले.

माजी क्रिकेटपटू माधव मंत्री जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून  वानखेडे स्टेडियमवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर विशेष अतिथी कक्ष आणि माजी कर्णधार वेंगसरकर स्टॅण्डचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ, सचिन तेंडुलकर आणि महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘‘वानखेडे स्टेडियमवर स्टॅण्ड, अतिथी कक्ष किं वा प्रवेशद्वारावर नावे चमकण्यासाठी कर्तृत्व गाजवायला लागते. जाहिरातीदारांकडून ही नावे दिली जात नाहीत.’’

गावस्कर, विश्वनाथ, सचिन अद्वितीय फलंदाज -वेंगसरकर

गावस्कर यांच्यासारखा सलामीवीर तसेच विश्वनाथ आणि सचिन यांच्यासारखे मधल्या फळीतील फलंदाज वारंवार घडत नाहीत,  असे वेंगसरकर यांनी सांगितले. ‘‘मी  १९७४ मध्ये येथे पहिला स्थानिक सामना खेळलो, तेव्हा हा स्टॅण्ड बांधला जात होता. एक वर्षांने वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात क्लाइव्ह लॉइडने नाबाद २४२ धावांची खेळी साकारली होती. तीसुद्धा मी त्याच स्टॅण्डमधून पाहिली. इतके च नव्हे, तर महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये मी २४२ धावांची खेळी उभारली होती,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.

हुकलेल्या पुरस्काराने प्रेरणा दिली -गावस्कर

१९६५-६६ मध्ये ‘एमसीए’ने मला सर्वोत्तम कनिष्ठ क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला नाही. त्याच प्रेरणेने मला घडवले आणि येथे विशेष अतिथी कक्षासह आज मला सन्मानित करण्यात आले. मुंबईचे

क्रिकेट हे माझे मायबाप आहे, असे गावस्कर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माझ्या यशाचे श्रेय नानामामांना (मंत्री) यांना जाते. हिंदू कॉलनीमधील त्यांच्या घरातील कपाटात अनेक टोप्या होत्या. त्यापैकी मी एक त्यांच्याकडे मागितली. तेव्हा त्यांनी मला खडसावले की, या सहज मिळत नसतात, त्या मिळवायच्या असतात. त्यासाठी मैदानावर घाम गाळायचा असतो. हा माझ्यासाठी धडा होता.’’

वेंगसरकर यांच्या अश्रूंचा सन्मान -सचिन

१९९१ मधील हरयाणाविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत मुंबईने दोन धावांनी निसटता पराभव पत्करला. या सामन्यात खडूसपणा काय असतो, हे मुंबईने दाखवून दिले. हा सामना गमावल्यानंतर वेंगसरकर यांच्या डोळ्यांत अश्रू होते.  त्यांच्या संस्मरणीय खेळीचा सन्मान ‘एमसीए’ने या स्टॅण्डनिशी के ला आहे,’’ असे सचिनने सांगितले. ‘‘मुंबई क्रिकेट संघटनेचा कनिष्ठ क्रिकेटपटूसाठीचा पुरस्कार हुकल्याबद्दल मला अतिशय दु:ख झाले होते. परंतु गावस्कर यांनी पाठवलेल्या पत्राने मला प्रेरणा दिली. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, तू ‘एमसीए’च्या कनिष्ठ

क्रिकेटपटूंच्या पुरस्कार विजेत्यांची यादी पाहा, यात एका क्रिकेटपटूचे नाव नाही. परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरी कामगिरी के ली आहे,’’ असे सचिन म्हणाला.

वानखेडेवर क्रिकेट संग्रहालय

मुंबई क्रिकेटच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी लवकरच क्रिकेट संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे ‘एमसीए’चे अध्यक्ष विजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.

गावस्कर यांच्या तीन खेळी संस्मरणीय -विश्वनाथ

विश्वनाथ यांनी गावस्करच्या तीन संस्मरणीय खेळींचे वर्णन आपल्या अध्र्या तासाच्या दीर्घभाषणात केले. ‘‘गावस्करकडे तंत्र आणि एकाग्रता ही महत्त्वाची वैशिष्टय़े होती. वेगवान गोलंदाजांशी तो धीराने सामोरा जायचा. पाचव्या दिवशी कसोटी सामन्यात कसे खेळायचे, हे त्याने दाखवून दिले,’’ असे विश्वनाथ म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai cricket association honours sunil gavaskar dilip vengsarkar zws

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना