Siddhesh Lad Named As Mumbai Captain: आगामी रणजी ट्रॉफी २०२-२७ स्पर्धा सुरू होण्याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने कर्णधारपद सोडल्यानंतर मुंबईच्या रणजी संघाची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आली होती. आता शार्दुलला कर्णधारपदावरुन काढण्यात आलं असून, ही जबाबदारी सिद्धेश लाडकडे सोपवण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, वर्कलोड मॅनेजमेंटमुळे शार्दुलला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. गेल्या हंगामातही शार्दुल ठाकूरच्या अनुपस्थितीत सिद्धेश लाडने संघाचं नेतृत्व केलं होतं. यावेळी तो पूर्णवेळ कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर गेल्या हंगामात मुंबईने संघाचा कर्णधार बदलला. रहाणेच्या जागी शार्दुल ठाकूरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. पण गेल्या हंगामात मुंबईचा संघ हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. या हंगामात मुंबईला घरच्या मैदानावर खेळताना जम्मू- काश्मीर संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईला या हंगामात क्वार्टर फायनलमधून बाहेर व्हावं लागलं होतं. पण फलंदाजीत सिद्धेश लाड चमकला होता. सिद्धेश लाडने ८सामन्यांमध्ये फंलदाजी करताना ७७.४० च्या सरासरीने ७७४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि १ अर्धशतक झळकावलं होतं.

शार्दुलला कर्णधारपदावरुन काढण्याचं नेमकं कारण काय?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनने शार्दुल ठाकूरला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधारपदाचा दबाव येऊ नये आणि फिट राहुन त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण शार्दुल ठाकूर संघाचा भाग असणार आहे. गेल्या हंगामातही शार्दुल ठाकूरला दुखापतीमुळे बाहेर राहावं लागलं होतं, त्यावेळी त्याच्या अनुपस्थितीत सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करताना दिसून आला होता. आगामी हंगामात मुंबईचा संघ साखळी फेरीतील १० सामने खेळणार आहे. पहिला सामना ११ ऑक्टोबरला चंदीगड संघाविरुद्ध होणार आहे.

सिद्धेश लाडची कामगिरी

सिद्धेश लाड हा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात विश्वासू फलंदाजांपैकी एक आहे. मुंबईसाठी त्याने प्रथम श्रेणी, लिस्ट ए क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमध्ये मिळून ८००० हून अधिक धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने एकूण ५६२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान गोलंदाजी करताना ८ गडी देखील बाद केले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ५६ सामन्यांमध्ये त्याने १५७१ धावा केल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमधील ६१ सामन्यांमध्ये त्याने ९४४ धावा केल्या आहेत.