विजय नवनाथ, शिवशक्ती संघाला जेतेपद

व्यावसायिक पुरुषांच्या प्रथम श्रेणी गटात मुंबई पोलीस संघाने, तर द्वितीय श्रेणी गटात टीबीएम स्पोर्ट्स क्लबने अजिंक्यपद मिळवले.

कुमार गटातील विजेता विजय नवनाथ क्रीडा मंडळ.

मुंबई जिल्हा कबड्डी स्पर्धा

विजय नवनाथ क्रीडा मंडळ आणि शिवशक्ती महिला संघ ‘अ’ यांनी मुंबई जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुक्रमे कुमार आणि कुमारी गटाचे जेतेपद पटकावले. व्यावसायिक पुरुषांच्या प्रथम श्रेणी गटात मुंबई पोलीस संघाने, तर द्वितीय श्रेणी गटात टीबीएम स्पोर्ट्स क्लबने अजिंक्यपद मिळवले.

वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुमार गटाच्या अंतिम सामन्यात विजय नवनाथ क्रीडा मंडळाने न्यू परशुराम क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३३-२२ असा मोडून काढला. हर्ष लाड, दीप बोर्डवेकर, प्रथमेश दहिबावकर यांच्या उत्कृष्ट चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. परशुराम संघाकडून शुभम धनावडे, भावेश लोदी यांनी अप्रतिम खेळ केला. कुमारी गटात शिवशक्ती ‘अ’ संघाने शिवशक्ती ‘ब’ संघाला १०-०५ असे नमवले. प्रतीक्षा तांडेल, साक्षी रहाटे, साधना विश्वकर्मा या विजयात चमकल्या. शिवशक्ती ‘ब’ संघाच्या ज्योती डफळे, प्राची भादवणकर यांचा खेळ आज बहरला नाही.

व्यावसायिक प्रथम श्रेणीत विठ्ठल कट्टामणी, लवू गर्जे यांच्या सर्वागसुंदर खेळाच्या जोरावर मुंबई पोलीस संघाने मुंबई टपाल संघाला ३१-२९ असे पराभूत केले. रोशन परब, श्रीकांत पाटील यांनी उत्तरार्धात सामना वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. द्वितीय श्रेणीत टीबीएम स्पोर्ट्स क्लबने अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवास इंटरप्रायझेसचा २७-२६ असा पराभव केला. जितेश पाटील, रोहित मोकल टीबीएमकडून, तर आदिनाथ घुले, चांदसाब बागा शिवासकडून उत्तम खेळले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai district kabaddi tournament vijay navnath shiv shakti team won abn

ताज्या बातम्या