डोमेस्टिक क्रिकेटमधला दादा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने हैदराबादचा धुव्वा उडवत दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला. मुंबईची अशीच घोडदौड कायम राहिली तर ४३वे जेतेपद प्रत्यक्षात साकारू शकते. उत्पल इथल्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबईने हैदराबादविरुद्ध ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. विजयाचं अंतर मोठं असूनही मुंबईने बोनस गुण मात्र गमावला.

हैदराबादसाठी नेतृत्व पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजला या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने ५६० धावांचा डोंगर उभारत हा निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध केलं. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आतूर सर्फराझ खानने १९ चौकार आणि ९ षटकारांच्या साह्याने २२७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. कर्णधार सिद्धेश लाडने १०४ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

अनुभवी अजिंक्य रहाणेने रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर केलं होतं. अजिंक्यच्या अनुपस्थितीत अष्टपैलू शार्दूल ठाकूरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. शार्दूल दुखापतग्रस्त झाल्याने काही सामने श्रेयस अय्यरने नेतृत्वाची धुरा सांभाळली. या लढतीत सिद्धेश लाड मुंबईचा कर्णधार आहे. सुवेद पारकरने ७५ धावांची खेळी केली. हैदराबादतर्फे रक्षण रेड्डीने ४ तर रोहित रायुडूने २ विकेट्स घेतल्या.

मुंबईच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर खेळताना हैदराबादची घसरगुंडी उडाली आणि त्यांचा पहिला डाव २६७ धावांतच आटोपला. राहुल सिंगने ९६ धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईकडून हिमांशू सिंगने ३ तर तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

मोठी आघाडी असल्यामुळे मुंबईने हैदराबादला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तनुष कोटियन या लढतीत दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हता. आजारी असल्यामुळे शम्स मुलानी या लढतीत खेळू शकला नाही. अथर्व अंकोलेकरवर फिरकीची जबाबदारी होती. मात्र चेंडू अडवताना अथर्वही दुखापतग्रस्त झाला. त्याला स्ट्रेचरच्या माध्यमातून उपचारांसाठी नेण्यात आलं. तो ३-४ आठवडे खेळू शकणार नाही. अथर्वच्या जाही ओंकार तारमाळेला इंज्युरी सबस्टिट्यूट म्हणून संधी देण्यात आली.

दुसऱ्या डावात हैदराबादने थोडा बरा प्रतिकार करत तीनशेची वेस ओलांडली. चामा मिलिंदने ८५ धावांची खेळी केली. नितीन साई यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३२ धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे हैदराबादने डावाचा पराभव टाळला. हैदराबादचा डाव ३०२ धावांवर आटोपला. मुंबईतर्फे मुशीर खानने ५ विकेट्स घेण्याची करामत केली. मोहित अवस्थीने ३ तर ओंकार तारमाळेने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

जिंकण्यासाठी १० धावांचं नाममात्र लक्ष्य मिळालेल्या मुंबईला बोनससाठी १० विकेट्सनी जिंकणं आवश्यक होतं. मात्र सलामीवीर अखिल हेरवाडकर स्टंपिंग होऊन तंबूत परतला. आकाश आनंद आणि हिमांशू सिंग यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.