Mumbai Under-19 Cricketer Arrested in Ticket Black Marketing: अलीकडेच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवत तिसऱ्यांदा हा चषक जिंकला. तत्पूर्वी मुंबईतील वानखेडे मैदानावर भारताने इंग्लंडविरोधात निर्णायक विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक घेतली होती. दरम्यान मुंबईत झालेल्या सामन्याची तिकिटे चढ्या दराने काळ्या बाजारात विकल्याच्या आरोपाखाली मुंबई अंडर-१९ संघाचा माजी क्रिकेटपटू बलवंत सिंग स्वरूप सिंग सोढा (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. डिबी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांनी ही सातवी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सोढाचा फोन जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी सुरू आहे. तिकिटे कुठून मिळवली आणि या रॅकेटशी अजूनही कुणी संबंधित आहे का? याचा छडा लावला जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणात २४ तिकिटे जप्त केली असून ती मुंबई क्रिकेट असोसिएशनला परत देण्यात आली आहेत. ही तिकिटे कुणाला देण्यात आली होती, याची माहिती मागवली जात आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोढाने प्रत्येकी २५ हजार रुपयांना दोन तिकिटे विकली. पण ही तिकिटे त्याने कुठून मिळवली, याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. या तपासाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सोढाचा कॉल रेकॉर्ड तपासत असून आणखी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
प्रकरण कसे उघड झाले?
आदित्य रावराणे नामक व्यक्ती चढ्या दराने तिकिटे विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तोतया ग्राहक बनून रावराणेशी संपर्क साधला. विलेपार्ले येथील एका कॅफेत भेटल्यानंतर रावराणेने २५ हजार रुपयांची दोन तिकिटे विकण्यास होकार दर्शवला.
रावराणेची चौकशी केली असता त्याने सिद्धार्थ सभापतीचे नाव घेतले. यानंतर अधिक तिकिट हवे असल्याचे सांगून पोलिसांनी सभापतीला संपर्क साधण्यास लावले. सभापतीने मेघन प्रधान करवी दोन अतिरिक्त तिकिटे पाठवून दिली. यानंतर प्रधानलाही अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांकडे चार तिकिट जमा झाले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मोफत किंवा अनुदानित दरातील तिकिटे चढ्या दराने पुन्हा विकण्यात येत असल्याचा अटकेत असलेल्या आरोपींवर करण्यात आला. आदित्य रावराणे आणि त्याच्या सहा साथीदारांना या महिन्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता २५ मार्च रोजी सोढालाही अटक करण्यात आली.
