बलाढय़ एअर फोर्स क्लबवर मात; भेकेचा निर्णायक गोल

रियाद : मुंबई सिटी फुटबॉल संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘एएफसी’ आशियाई चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात इराणमधील बलाढय़ संघ एअर फोर्स क्लबला २-१ असा पराभवाचा धक्का दिला. आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये सामना जिंकणारा मुंबई सिटी हा पहिलाच भारतीय संघ ठरला आहे.

२०२०-२१च्या इंडियन सुपर लीग विजेत्या मुंबई सिटी संघाने या सामन्यात अप्रतिम खेळ केला. ‘ब’ गटातील या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांनी आक्रमणावर अधिक भर दिला. ५९व्या मिनिटाला राखीव फळीतून मैदानात उतरलेल्या हम्मादी अहमदने गोल करत तीन वेळा ‘एएफसी’ चषक विजेत्या एअर फोर्स क्लबला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर मात्र मुंबईने सिटीने दमदार पुनरागमन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या बचाव फळीवर दडपण टाकले. याचा फायदा त्यांना ७०व्या मिनिटाला मिळाला. आघाडीपटू दिएगो मौरिसिओने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत मुंबई सिटीला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मग ७५व्या मिनिटाला मराठमोळय़ा राहुल भेकेने हेडर मारून गोल केल्याने मुंबई सिटीला सामन्यात पहिल्यांदाच आघाडी मिळाली. यानंतर त्यांनी भक्कम बचाव करताना हा सामना २-१ अशा फरकाने जिंकत इतिहास रचला.

मुंबईला या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अल शबाब संघाने ०-३ असे पराभूत केले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना खेळ उंचावण्यात यश आले. आता त्यांचा पुढील सामना गुरुवारी अमिरातीमधील एल जझीरा संघाशी होणार आहे.