यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवला.

मुंबईने गुजरातचा सात गडी आणि ४८ चेंडू राखून धुव्वा उडवत अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. वेगवान गोलंदाज सक्षमने (४/२२) गुजरातचा डाव ४६.४ षटकांत २२७ धावांत गुंडाळला. मग यशस्वी-अरमानच्या ११३ धावांच्या सलामीमुळे मुंबईने ४२ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले.

विजयानंतरही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर

सलामीवीर डी. एस. पटनागरेच्या (११७ धावा) शतकाच्या बळावर महाराष्ट्राने चंडीगडवर १२ धावांनी सरशी साधली. या विजयानंतरही ‘क’ गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने महाराष्ट्राने गाशा गुंडाळला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ७ बाद ३३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमृत लुबानाच्या शतकानंतरही चंडीगडला ५० षटकांत ८ बाद ३२५ धावांपर्यंतच मजल मारता आली.